08 July 2020

News Flash

बाजारगप्पा : जुन्या कपडय़ांचा बाजार

ठाणे पूर्वेला स्थानकापासून हाकेच्या अंतरावर जुन्या कपडय़ांचा हा बाजार वर्षांनुवर्षे आपले अस्तित्व टिकवून आहे.

ठाणे पूर्वेला स्थानकापासून हाकेच्या अंतरावर जुन्या कपडय़ांचा हा बाजार वर्षांनुवर्षे आपले अस्तित्व टिकवून आहे.

‘भांडी घ्या भांडी.. जुन्या कपडय़ांवर नवी भांडी घ्या..’ अशी आरोळी कानावर आली की,  कपाटातील जुने, फाटलेले, शिलाई उसवलेले, वापरून वापरून कंटाळा आलेले कपडे बाहेर पडतात. बोहारणींकडीला जुने कपडे देऊन हवे ते भांडे घ्यायचे हा ‘लेनदेन’चा मामला पार पडतो; पण मग जुन्या कपडय़ांचे काय होते, असा प्रश्न कधी तरी तुम्हाला पडला असेलच. याचं उत्तर हवं असेल तर ठाण्यातल्या जुन्या कपडय़ांच्या बाजाराला नक्की भेट द्या.

ठाणे पूर्वेला स्थानकापासून हाकेच्या अंतरावर जुन्या कपडय़ांचा हा बाजार वर्षांनुवर्षे आपले अस्तित्व टिकवून आहे. दिवसभर वसाहतींमध्ये फिरून जमा केलेले जुने कपडे या बाजारात आणून विकले जातात. बोहारणींकडे जमा झालेल्या या कपडय़ांमधील बरे वाटावे असे कपडे वेगळे करून ते स्वच्छ धुऊन बाजारात आणले जातात. आता हे जुने कपडे कोण घेत असेल, असा प्रश्न साहजिकच उद्भवतो. तर रेल्वे स्थानकाबाहेर १०० रुपयांना शर्ट विकणारे विक्रेते आपण येता-जाता पाहत असतो. तर कधी आठवडी बाजारातही केवळ १५० रुपयांना महिलांचे कुर्ते, १०० रुपयांच्या साडय़ा विकायला आलेल्या पाहायला मिळतात. या बहुतांश विक्रेत्यांनी हा माल जुना कपडा बाजारातूनच विकत घेतलेला असतो. या बाजारात जितक्या बोहारणी असतात त्याहून जास्त संख्येने हे छोटे व्यापारी येतात. गुजरातमधील वाघरी समाज व भटके-विमुक्त जमातीतील जोशी समाज या व्यवसायात प्रामुख्याने आढळतो. गावोगावी हिंडून कपडे जमा करणे हा या समाजाचा व्यवसाय आहे. अनेकदा कुटुंबातील सर्व सदस्य हाच व्यवसाय करतात; पण कपडे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये ९० टक्के मुस्लीम आहेत.

सुरुवातीला हा बाजार मुलुंड स्थानकाजवळ भरत असे. तेथे मुंबई व उपनगरातील बोहारणी कपडे विकण्यासाठी येत असत. मात्र जागेच्या वादावरून ठाण्यातील बोहारणींनी आपल्या घराजवळील रस्त्यावर विक्री सुरू केली. येथे मोकळी जागा मिळत असल्याचे लक्षात आल्यावर इतर बोहारणीही येथे विक्री करण्यास येऊ लागला. परिणामी मुलुंडमधला बाजार बंद पडून ठाण्यातच जुना कपडा बाजारच सुरू झाला. गेल्या ४० वर्षांत येथे येणाऱ्या बोहारणींची संख्याही अनेक पटीने वाढली आहे.

पाच रुपयांपासून सुरुवात

हा बाजार दुपारी ३ च्या सुमारास सुरू होतो आणि ५ वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या दोन तासांत कपडय़ांची विक्रीही होते. रस्त्याच्या एका कोपऱ्यावर साधारण एक किलोमीटर अंतरावर या महिला रांग लावून बाजार सुरू होण्याची वाट पाहत असतात. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी डोक्यावर पदर घेतलेल्या या बहुतांश महिलांच्या कडेवर त्यांचे मूल असते. बाजाराच्या प्रमुखाने संकेत देताच तोपर्यंत शांत असलेला बाजारात एकच कल्लोळ सुरू होतो. अगदी पाच रुपयांपासून कपडय़ांची विक्री सुरू होते. जीन्स, शर्ट, साडय़ा यानुसार कपडय़ांची विभागणी केली जाते. प्रत्येक व्यापारी या बोहारणींकडून त्याला हव्या असलेल्या कपडय़ांची मागणी करतो. मात्र किंमत पटली नाही तर सरळ या बोहारणी व्यापाऱ्यांना मार्गाला लावतात.

जुन्यावर नवा साज

सौदा पटल्यानंतर व्यापारी खरेदी केलेल्या सर्व कपडय़ांची बोचकी बांधून टेम्पोतून ती घेऊन जातात. पुढे यातल्या विटलेल्या कपडय़ांवर नवा रंग चढविला जातो. बटणे, शिलाई उसवली असल्यास ती दुरुस्त केली जाते. कपडय़ांना नवा साज देण्यासाठी प्रत्येक कपडय़ावर किमान दहा ते वीस रुपये खर्च केला जातो. त्यानंतर रस्त्यावर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे हे कपडे जातात. रस्त्यावर विकताना २० रुपयाला घेतलेल्या जीन्सची किंमत १५० पर्यंत पोहोचलेली असते. आपण दुकानातून विकत घेतलेली ५०० रुपयांची नवी साडी जुना बाजारात २० रुपयाला विकली जाते आणि या साडीवर पुन्हा काम करून त्याची किंमत १५० ते २०० रुपये होते. अर्थात ५ ते २० रुपयांदरम्यान उपलब्ध असलेल्या या कपडा बाजाराची उलाढाल असून असून किती असेल, असा प्रश्न पडेल. प्रत्यक्षात दिवसाला येथे काही लाखांमध्ये उलाढाल होत असते. सध्या या बाजारात एक ते दीड हजार बोहारणी आहेत आणि तितकेच व्यापारीही. या बाजाराची पालिकेकडेही नोंद आहे. प्रत्येक विक्रेत्याकडून दिवसाचे दहा रुपये पालिकेकडे जमा होतात.

पूरक व्यवसायही तेजीत

या परिसरात जुना कपडा बाजारावर आधारित अनेक पूरक व्यवसायही मूळ धरून आहेत. कपडय़ांच्या मोबदल्यात द्याव्या लागणाऱ्या भांडय़ांची सोय व्हावी म्हणून या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला प्लास्टिक, स्टील, अ‍ॅल्युमिनिअमच्या भांडय़ांची विक्री केली जाते. त्यामुळे या बोहारणी कपडय़ांची विक्री झाली की आलेल्या पशातून येथेच भांडय़ांची खरेदी करतात. त्यामुळे येथील भांडी विक्रेत्यांचा व्यवसायही तेजीत चालतो.

याशिवाय भर उन्हात रस्त्यावर बसलेल्या या महिलांना पिण्याचे पाणी, चहा, वडापाव विकणारे विक्रेते या बाजारात दिसून येतात. थोडक्यात हा बाजार समाजातील एका वंचित घटकाचे प्रतिनिधित्व करत असतो. मुंबई-ठाण्यात मोठाले मॉल उभे राहिले तरी या बाजाराचे महत्त्व संपलेले नाही, हेही विशेष.

साडय़ांना मागणी

साडय़ांना मात्र या बाजारात खूप मागणी असते. येथे एक साडी किमान २० रुपयांना विकली जाते. त्यामुळे साडय़ा असतील तर चांगले भांडे पदरी पडण्याची शक्यता अधिक असते. येथे व्यापाऱ्यांबरोबर कपडे स्वस्तात उपलब्ध होतात म्हणून अनेक गरीब-निम्न मध्यवर्गीय कुटुंबेही खरेदीसाठी येतात. अर्थात मुख्य ग्राहक हा घाऊक खरेदी करणारा व्यापारीच असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2017 1:52 am

Web Title: second hand clothes market in thane kopri
Next Stories
1 तपासचक्र : तिची काय चूक होती?
2 मुंबई महापालिकेची यंदा ‘वास्तववादी’ कपात!
3 पोटच्या गोळ्यासाठी मातेची बिबटय़ावर झडप!
Just Now!
X