विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीकरिता चार अर्ज दाखल झाल्याने चुरस वाढली आहे. अविश्वास ठरावावर राष्ट्रवादीला साथ दिली असली, तरी सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले, तरी काँग्रेस आणि शिवसेनेच्या खेळीमुळे राष्ट्रवादीला भाजपवर अवलंबून राहावे लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याकरिता काँग्रेस आणि शिवसेना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
सभापतीपदासाठी रामराजे नाईक-निंबाळकर (राष्ट्रवादी), डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), शरद रणपिसे (काँग्रेस) आणि श्रीकांत देशपांडे (अपक्ष) यांचे अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीने अपक्षांच्या मदतीने सभापतीपद मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस (२१), शिवसेना (७) आणि काही अपक्ष एकत्र आल्यास राष्ट्रवादीला भाजपची मदत घ्यावी लागेल. अजित पवार यांनी उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र यावेत, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची ‘युती’ अधोरेखित झाली असली तरी मतदानात दोघे एकत्र यावेत, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
काँग्रेस शिवसेनेला मतदान करू शकत नाही. तसेच शिवसेनेची मदत घेणे काँग्रेसला त्रासदायक ठरू शकते. यामुळेच शिवसेनेच्या जवळचे मानले जाणारे अपक्ष श्रीकांत देशपांडे यांना मतदान करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, डॉ. पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख आदी ज्येष्ठ नेत्यांशी उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा
केली.

डाखखरे यांना डावलले
गेली १४ वर्षे उपसभापतीपद भूषविणाऱ्या वसंत डावखरे यांना सभापतीपदी बढती देण्याचे टाळून राष्ट्रवादीने रामराजे नाईक-निंबाळकर यांना संधी दिली. पक्षातील या घडामोडींमुळे डावखरे नाराज झाल्याचे समजते.

भाजपची राष्ट्रवादीला मदत?
राष्ट्रवादीचे उमेदवार निंबाळकर यांच्या विजयासाठी भाजप प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणार आहे. भाजपबरोबर असलेल्या अपक्ष आमदारांच्या मतांवर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असल्यास भाजप तटस्थ राहू शकते. पण तटस्थ राहून मतांचे गणित जुळत नसल्यास भाजप राष्ट्रवादीला मतदान करण्याची शक्यता आहे. भाजपने राष्ट्रवादीला मतदान करावे, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.