पालिका, पोलीस इत्यादी अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींचे लसीकरण

मुंबई : करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी पालिकेने सुरू केली असून अत्यावश्यक सेवेतील दीड लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी नावे नोंद केली आहेत. दुसऱ्या टप्प्यात पालिका, पोलीस इत्यादी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सध्या सुरू असून पहिल्या मात्रेनंतर २८ दिवसांनी पुढील मात्रा देण्यात येणार आहे. दरम्यान पुढील टप्प्यांची तयारी पालिकेने सुरू केली आहे. ‘दुसऱ्या टप्प्यात पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची माहिती थेट प्रशासकीय विभागातून घेतली आहे. तर कंत्राटी स्वरूपात कायऱ्रत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती प्रत्येक विभागाला देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांची माहिती देण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिलेल्या आहेत. आत्तापर्यंत सुमारे दीड लाख कर्मचाऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी झाली असून यात आणखी वाढ होणार आहे,’ असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात लशीची पहिली मात्रा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर लशीचा साठा उपलब्ध झाल्यास लगेचच दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण करण्याचीही तयारी आहे. यासाठी पालिकेचे ७५ दवाखाने लसीकरण केंद्र म्हणून सुरू करण्यात येतील. तेव्हा पहिल्या टप्प्याच्या दोन्ही मात्रा पूर्ण होईपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्याची नोंदणी अजूनही सुरूच

शहरातील ५२५१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पण पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी सुमारे एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली होती. या पहिल्या टप्प्याची नोंदणी अजूनही सुरू असून गेल्या काही दिवसांत आणखी २० हजार कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे.