संशयित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांच्या पोलीस कोठडीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ

राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) आतापर्यंत केलेल्या तपासातून संशयित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांना आपल्या कृतीची पूर्ण जाणीव होती. काय करतोय, कशासाठी करतोय याची इत्थंभूत माहिती होती. त्यामुळे या टप्प्यावर तपास रोखता येणार नाही. तपास पुढे सुरू राहणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने शनिवारी वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांची पोलीस कोठडी २८ ऑगस्टपर्यंत वाढवली.

आरोपींचा नेमका कट, मुख्य सूत्रधार, अन्य साथीदार, याआधीच्या गुन्ह्य़ातील सहभाग याबाबत सखोल तपास करण्यासाठी अटक आरोपी आणखी १५ दिवस पोलीस कोठडीत राहाणे आवश्यक आहे, अशी मागणी एटीएसने अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्या. विनोद पडळकर यांच्या न्यायदालनात केली. पोलीस कोठडीची मुदत का वाढवावी यासाठीची १९ कारणेही अर्जात जोडली. सरकारी वकिलांनी या तिघांची अटक, नालासोपारासह राज्याच्या विविध भागांमधील छापे, त्यातून मोठय़ा प्रमाणावर हस्तगत करण्यात आलेला शस्त्र, स्फोटकांचा साठा आणि तपासाला दिशा देणाऱ्या अन्य वस्तूंबाबत न्यायालयाला माहिती दिली. अटकेनंतरचा कालावधी चौकशीतून पुढे आलेल्या माहितीआधारे छापे घालण्यात गेला. या आरोपींकडून आणखी या घातक वस्तूंचा आणखी साठा हस्तगत होईल, असा दाट संशय एटीएसला आहे. या घातक साठय़ाचा वापर कधी, कुठे, कशासाठी होणार होता याबाबत आरोपींकडे चौकशी सुरू आहे. त्यासाठी आरोपींकडे स्वतंत्रपणे, समोरासमोर ठेवून चौकशी करावी लागणार आहे. या तिघांनीच कट आखला की त्यांच्यामागे सूत्रधार आहे, याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा घातक साठा त्यांनी कुठून, कसा मिळवला, आरोपींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या साथीदारांचा शोध एटीएस घेत आहे. छाप्यांमधून काही चिठ्ठया, पत्रे, डायरी आणि अन्य कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यात काही शब्द सांकेतिक आहेत. या शब्दांचा नेमका अर्थ समजून घेऊन शहानिशा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोंधळेकरच्या कार्यालयातून एक पत्र हस्तगत करण्यात आले. त्यातील हस्ताक्षर तपासून ते त्यानेच लिहिले आहे का, याची खातरजमा केली जात आहे. आरोपींच्या मोबाइलची तपासणी सुरू आहे. त्यातून ज्या गोष्टी काढून टाकण्यात (डीलीट) आल्या त्या परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.

आरोपींनी भयंकर कट रचला आणि तो अमलात आणण्याची धडपड सुरू केली, असे एटीएसने आतापर्यंत केलेल्या तपासातून सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे. त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला घातक साठा आाणि वाहनांच्या नंबर प्लेटस आधी कोणत्या गुन्ह्य़ात वापरण्यात आल्या होत्या का याबाबत चौकशी व तपास सुरू आहे. त्यासाठी आरोपींची कोठडीतील चौकशी अनिवार्य आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यास बचावपक्षाचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी विरोध केला.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

एटीएसने राऊत, कळसकर, गोंधळेकर यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितली. मात्र त्यांनी वेळ दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्याचा भार आहे. गृहमंत्री म्हणून एटीएसच्या कारवायांची सर्वस्वी जबाबदारी फडणवीस यांची आहे. याच गृहखात्याने राऊतसह तिघांनी मालेगाव येथे स्फोट घडवण्याचा, मराठा मोर्चाचे आंदोलन आणखी भडकवण्याचा, हे आंदोलन हाणून पाडण्याचा कट आखल्याच्या बातम्या हेतूपुरस्सर पेरल्या. प्रत्यक्षात तपास यंत्रणा मात्र हेतूबाबत अवाक्षर काढत नाही. त्यामुळे ही दिशाभूल आहे. याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. पुनाळेकर यांनी न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केली.