हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठातील बुद्धीमान दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणाचे अजूनही तीव्र पडसाद महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजात उमटत आहेत. रोहितच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या धर्मव्यवस्थेचे-जातीव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करु पाहणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या शासकीय कार्यक्रमांवर आंबेडकरी जनता, राजकीय पक्ष व संघटनांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन सेक्युलर मुव्हमेंट या संघटनेने केले आहे.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने येत्या १८ फेब्रुवारीला मुंबईत डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांनिमित्त गेट ऑफ इंडिया येथे आंबेडकरी जलसा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १७ जानेवारीला रोहित वेमुलाने आत्महत्या केली, त्याला एक महिना पूर्ण होत असताना, शासकीय पातळीवर अशा प्रकारचा कार्यक्रम राज्य सरकारने आयोजित केल्याबद्दल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येत आहे.
आता केवळ आंबेडकरी जलसाच नव्हे तर, केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आंबेडकर जयंती निमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या सर्वच शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन करणारे पत्रक सेक्युलर मुव्हमेंटने प्रसिद्धीस दिले आहे. या पत्रकावर प्रा. गौतमीपुत्र कांबळे (सांगली), डॉ. भरत नाईक, प्रा. जे. व्ही सरतापे, संग्राम सांवत, अवंती कवाळे (कोल्हापूर), डॉ. अशोक गायकवाड (औरंगाबाद), जयंत भालेराव, करुणासागर पगारे (नाशिक), प्रा. आंबादास कांबळे, मिलिंद सर्पे (नांदेड), बबन लव्हात्रे, तुका कोचे (नागपूर), अमर सावंत (सोलापूर), अ‍ॅड. प्रकाश होवाळ (पुणे), गौतम सांगळे, भारत चंदनशिवे, अ‍ॅड. सारीपुत्र सारनाथ (मुंबई) आदी पदाधिकाऱ्यांच्या स’ाा आहेत.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारणीभूत असलेले सरकारच आता कोटय़वधी रोहित वेमुलांचे मार्गदाते ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचा उत्सव साजरा करीत आहे. म्हणजे आता असंख्य रोहित वेमुलाचा मूक आक्रोष आंबेडकरी चळवळीच्या कानी पडणार नाही, अशी व्यवस्था केली जात आहे. म्हणूनच सर्व आंबेडकरवादी जनता, पक्ष व संघटनांनी आंबेडकर जयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा आणि जाती व्यवस्था निर्मूलासंबंधीचे स्वंतत्र कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन या संघटनेने केले आहे.