मुंबईमधील मेळाव्यातील सूर

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेत आलेल्या भाजपला एकूण मतदानापैकी ३१ टक्के मते मिळाली होती. याचाच अर्थ ६९ टक्के मतदान भाजपच्या विरोधात विखुरले गेले होते. हेच मतदान विरोधकांना संयुक्तपणे झाल्यास भाजपचा पराभव शक्य आहे, असा सूर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी लावला.

भाजप सरकारच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या पुढाकाराने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जनता दलाचे शरद यादव, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, काँग्रेसचे आनंद शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर, राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश यादव, खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते.

‘हम’ म्हणजे हिंदूू-मुस्लीम एकी. पण अलीकडच्या काळात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न भाजप सरकारकडून सुरू झाल्याची टीका सीताराम येचुरी यांनी केली. ताजमहालसंदर्भात देशात कधीही वाद झाला नव्हता. जगातील हे सातवे आश्चर्य आहे. आता भाजप सरकारने ताजमहालच्या विरोधातही वाद उकरून काढल्याचा आरोप शरद यादव यांनी केला.

वस्तू आणि सेवा कर तसेच नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला. वस्तू आणि सेवा करामुळे महागाईत वाढ झाली, अशी टीकाही सर्व विरोधी नेत्यांनी केली.