News Flash

राणीच्या बागेत झाडे सुरक्षित

समुद्रापासून दूर असल्याचा फायदा या झाडांना मिळत असला तरीही त्यांच्या सुरक्षित असण्याचे हे एकमेव कारण नाही.

|| नमिता धुरी

चक्रीवादळाच्या तडाख्यात चार हजारांपैकी केवळ तीन झाडे भुईसपाट

मुंबई : मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळात मुंबईत शेकडो झाडांची पडझड झाली. पावसाळ्यात अशा घटना अनेकदा घडतात; मात्र भायखळा येथील ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालया’तील (राणीची बाग) ४ हजारांहून अधिक झाडांपैकी के वळ तीन झाडे वादळात पडली. पुरेसा सूर्यप्रकाश, मुळे पसरण्यास पोषक जमीन आणि नियमित देखभाल यांमुळे मुंबईच्या मधोमध असलेला हा हरित पट्टा वादळातही सुरक्षित राहिला आहे.

मुंबईभर पसरलेल्या परदेशी झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड होत असताना राणीच्या बागेतील सर्व प्रकारची झाडे मात्र सुरक्षित उभी आहेत. भायखळा येथे ५० एकर जागेवर राणीची बाग वसली आहे. जगभरातील ७ खंडांपैकी ६ खंडांतील प्रजातींची झाडे येथे आहेत. येथील एकू ण ४ हजार १२४ झाडांपैकी २ हजार ९८७ झाडे परदेशी प्रजातींची आहेत. वादळाच्या दिवशी सातोडिया, गुलमोहर ही परदेशी प्रजातीची आणि अशोक हे स्थानिक प्रजातीचे अशी एकू ण तीन झाडे पडली. अन्य झाडांना मात्र कोणताही धोका पोहोचला नाही.

समुद्रापासून दूर असल्याचा फायदा या झाडांना मिळत असला तरीही त्यांच्या सुरक्षित असण्याचे हे एकमेव कारण नाही. रस्त्यावर उभ्या असलेल्या झाडांच्या भोवती उंच इमारती उभ्या असतात. त्यामुळे या झाडांना चहुबाजूंनी सूर्यप्रकाश मिळत नाही. अशा वेळी ज्या दिशेने सूर्यप्रकाश मिळेल त्याच दिशेला झाडे वाढत जातात. एकाच दिशेला झुकलेली झाडे वेगवान वाऱ्यात पडण्याचा धोका अधिक असतो. याउलट राणीच्या बागेतील झाडांना चहुबाजूंनी सूर्यप्रकाश मिळत असल्याने ती सरळ रेषेत वाढतात. त्यामुळे तौक्ते वादळ आले तेव्हा जास्तीत जास्त झाडे सुरक्षित राहिली, अशी माहिती प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

एकमेकां आधार देऊ…

रस्त्यांवर अनेकदा विविध कारणांसाठी खोदकाम होत असते. यात जवळपासच्या झाडांची मुळे कापली जातात. त्यामुळे ही झाडे कमकु वत होतात. राणीच्या बागेत प्रत्येक झाडाच्या भोवताली सर्वत्र झाडेच असल्याने जमिनीच्या खाली झाडांच्या मुळांची एकसंध जाळी तयार झाली आहेत. त्यामुळे ही झाडे एकमेकांना धरून ठेवतात, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेसी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 1:17 am

Web Title: secure the trees in the veermata jijabai bhosale gardens and zoo akp 94
Next Stories
1 लोअर परळ उड्डाणपुलाची प्रतीक्षा
2 ‘बेस्ट’ उपक्रमातही करोना नियंत्रणात
3 विकासकामांसाठी ४ हजार कोटींचे कर्ज
Just Now!
X