मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सोमवारी चार वर्षे पूर्ण होत असून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. रेल्वे आणि बस स्थानकांवरील सुरक्षाही वाढविण्यात आल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगितले.
मुंबईवर २००८ मध्ये २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचवेळी पुण्याच्या येरवडा येथील तुरूंगात या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला अलिकडेच फाशी देण्यात आले. त्यामुळे तालिबान तसेच अन्य काही अतिरेकी संघटनांनी भारतात पुन्हा दहशतवादी हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून भाभा अणुऊर्जा केंद्र, चेंबूर, माहुल, शिवडी येथील पेट्रोल टाक्या येथे बंदोबस्त वाढविल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी दिली.
शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. डॉ. सिंह यांनी सांगितले की, दहशतवादाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. पोलिसांना येणारे धमकीचे फोन खरे आहेत का, दहशतवादाचा केंद्रबिंदू नेमका कुठे आहे, दहशतवादी कोणत्या मार्गाचा वापर करून पुन्हा हल्ला करण्याची शक्यता आहे, आदीची माहिती जमा करण्यात येत आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षातील पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे १३ बॉम्बशोधक पथके सज्ज ठेवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.