पोलीस संरक्षणात मोठय़ा रुबाबात वावरणाऱ्या करोडपती माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह प्रसाद लाड, विजय कांबळे, बोमन इराणी, नेस वाडिया, बोनी कपूर आदी राजकारणी, चित्रपट कलावंत आणि बांधकाम व्यावसायिकांनी स्वसंरक्षणासाठी घेतलेल्या पोलीस बंदोबस्तापोटी पोलिसांनाच लाखो रुपयांना चुना लावल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हे पोलीस संरक्षण शुल्क वसूल करण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

चित्रपट कलावंतासह, निर्माते, पुढारी, विकासक व अन्य व्यक्तींनी सुरक्षिततेसाठी अंगरक्षक घेऊनही त्यांचे शुल्क पोलिसांना दिलेले नसल्याबाबतचा प्रश्न संजय पोतनीस, सुनील शिंदे आदी सदस्यांनी विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. डिसेंबर २०१५ अखेर ६२ व्यक्तींनी ५ कोटी ६४ लाख ८६ हजार रुपयांचे पोलीस संरक्षण शुल्क थकविले आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पोलिसांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना ही रक्कम वसूल करण्यास सांगण्यात आले आहे. ज्यांनी पोलीस संरक्षणापोटीचे शुल्क थकविले आहे, त्यामध्ये माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, विकास ड्रेसवाला, मोहम्मद शेख, नंदकुमार नाईक, प्रमोद पाटील, कैलास अग्रवाल, प्रसाद लाड, अरविंद शहा, युसूफ काँट्रॅक्टर, सुनील मंत्री, नाशिर शेख, बोमन इराणी, जेह वाडिया, नेस वाडिया, नस्ली वाडिया, तरबेज शेख, हुमायुम शेख, राजेश जैन, राजीव पाठक, तरजितसिंह सहानी, जगदीपसिंह सहानी आदींचा समावेश आहे.