सुरक्षा आयुक्तांचे मध्य रेल्वेवर ताशेरे

मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मध्य रेल्वेने पादचारी पुलांसह अन्य कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेतली. या कामांमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे यावर नाराजी व्यक्त करत ही कामे पावसाळ्यानंतर करावीत, अशा सूचना रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मध्य रेल्वे प्रशासनाला नुकत्याच केल्या आहेत.

मध्य रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल, फलाटांवरील छप्पर अशी काही कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेण्यात आली. मध्य रेल्वेवर १५ नवीन पादचारी पूल आणि १४ पुलांच्या दुरुस्तीचे कामांसह बहुतांश स्थानकातील फलाटांवर नवीन छप्पर बसवण्याच्या कामांचा समावेश आहे. पूल उभारणी व दुरुस्ती कामांमुळे स्थानकातील उर्वरित पुलांचा वापर प्रवासी करताना दिसतात. परंतु ऐन गर्दीच्या वेळी उर्वरित पुलांवर मोठा भार पडतो व धक्काबुकी होत असते. या कामांसाठी फलाटांवर सामान ठेवले जाते आणि खड्डेही पडतात.  परिणामी पावसाळ्यात मोठय़ा गर्दीचा सामना करावा लागेल. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त ए.के.जैन यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून पावसाळ्याच्या तोंडावर अशी कामे नकोत व पावसाळ्यातही करणे योग्य नसल्याचे म्हटले      (पान ६वर)

पावसाळ्यात पादचारी पुलांसह अन्य मोठी कामे नकोत. या कामांमुळे फलाटांवर होणारे खड्डे, सामान यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यानंतर कामे करावीत, असे मध्य रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.

– ए.के.जैन, रेल्वे सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवरील पुलांची सद्यस्थिती

* विक्रोळी, मुलुंड, ठाकुर्ली, डोंबिवली, टिटवाळा, वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डीसह काही स्थानकांत एकूण १५ नवीन पादचारी पुलांचे काम सुरू.

* मशीद स्थानकात दोन, कुर्ला, माटुंगा, दादर, विक्रोळी, भांडुप, ठाणेसह एकूण १४ जुन्या पादचारी पुलांची दुरुस्ती कामे सुरू .