घुसखोरांना चाप, मध्य रेल्वेवरील ६० लोकल फेऱ्यांमध्ये जवान

लोकलमधील अपंगांच्या डब्यात होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने आता डब्यांमध्ये सुरक्षा दल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभरात होणाऱ्या लोकलफेऱ्यांपैकी सर्वात जास्त घुसखोरी होणाऱ्या फेऱ्यांमध्ये एक सुरक्षा जवान तैनात केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या प्रयोगाला सुरुवात केली आहे.

घुसखोरी करणाऱ्या सामान्य प्रवाशाला या जवानांकडून प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. लोकलमधील अपंगांच्या डब्यात सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. गेल्या दोन वर्षांत पश्चिम रेल्वेवर ३४ हजार ३३८ आणि मध्य रेल्वेवर ३१ हजाराहून अधिक घुसखोर प्रवाशांवर कारवाई केली आहे. परंतु या कारवाईनंतरही घुसखोरी काही कमी होत नसल्याचे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी सांगतात. घुसखोर सामान्य प्रवाशांच्या कार्यालयात पत्र धाडून त्याने केलेला गुन्हा कार्यालयीन प्रमुखांच्या निदर्शनास आणून देण्याचीही शक्कल लढवली. परंतु त्याचाही फायदा झाला नाही. अखेर अपंगांच्या डब्यातच सुरक्षा दलाचा जवान तैनात करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर दररोज १,७०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या होतात. या फेऱ्यांमध्ये गर्दीच्या वेळी सर्वात जास्त घुसखोरी होणाऱ्या लोकल फेऱ्यांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार अपंगांच्या डब्यात सुरक्षा दलाचा जवान तैनात करण्यात आल्याचे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के.के. अशरफ यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून हा नवा प्रयोग केला जात असून त्यासाठी ६० लोकल फेऱ्या निवडण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून कोणताही कारवाई न करता फक्त सामान्य प्रवाशांना रोखण्यात येईल. प्रत्येक डब्यात एक याप्रमाणे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी धावणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये हे जवान तैनात असतील.  या प्रयोगामुळे सामान्य प्रवाशांची घुसखोरी थांबल्यानंतर किंवा त्याचे प्रमाण कमी झाल्यास आणखी काही लोकल फेऱ्यांमध्ये जवान तैनात केले जातील, अशी माहिती अशरफ यांनी दिली.

या गाडय़ांमध्ये घुसखोरी

 सकाळी गर्दीच्या वेळी बदलापूर, टिटवाळा, कल्याण, ठाणेहून  दादर, सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या. तसेच वाशीहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल फेऱ्या. सायंकाळी गर्दीच्या वेळी सीएसएमटीहून कुर्ला, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, खोपोली, मानखुर्द, वाशी लोकल फेऱ्या.