पाच लाखांच्या खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन वॉचमनना अवघ्या काही तासांत गोवंडी पोलिसांनी अटक करून मुलाची सुटका केली.
याबाबत माहिती देताना गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रल्हाद पानस्कर यांनी सांगितले की, गोवंडीच्या गायकवाड नगरमधील राजाराम डावरे यांचा १६ वर्षीय मुलगा कुणाल सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. कुणाल ग्तिमंद असून अधून मधून त्याच्या डोक्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे त्याच्या खिशात वडिलांचा मोबाईल क्रमांक आणि घरचा पत्ता लिहिलेला कागद असतो. बराच वेळ झाला तरी कुणाल घरी न आल्याने त्याच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. दरम्यान साडेबारा वाजता राजाराम डावरे यांना अपहरणकर्त्यांनी फोन करून कुणालचे अपहरण केल्याचे सांगितले. कुणालच्या सुटकेसाठी त्यांनी पाच लाखांची खंडणी मागितली होती. गोवंडी पोलिसांनी कु णालच़्ा कुटुंबियांच्या मदतीने अपहणरकर्त्यांशी संवाद साधत खंडणीची रक्कम देण्यास तयार असल्याचे सांगितले.
ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी तीन वाजता मानखुर्द रेल्वे स्थानकात पैसे घेण्यासाठी आलेल्या रामसिंग उर्फ राम्या पाटील (२४) आणि उमेश उर्फ उम्या वरतीते (२१) या दोघांना अटक केली. हे दोघेही पनवेल येथे सुरक्षा रक्षक आहेत. रस्त्यावर विमनस्क अवस्थेत फिरत असलेल्या कुणालला हेरून त्यांनी त्याचे अपहरण केल्याचे पोलिसांनी सांगितले.