शैलजा तिवले

करोनासारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये आवश्यक वैयक्तिक सुरक्षा साधने(पीपीई) मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एचआयव्ही रुग्णांसाठी वापरली जाणारे पीपीई वापरावे लागत आहेत. हे पीपीई पूर्णत: सुरक्षित नसल्याने यांची सुरक्षा मात्र यामुळे धोक्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे एचआयव्हीबाधित व्यक्तीच्या शस्त्रक्रिया करताना रक्ताशी थेट संपर्क येऊ नये म्हणून पीपीई वापरण्यात येते. करोनासारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये रुग्णाने शिंकल्यावर किंवा खोकल्यावर बाहेर पडणाऱ्या विषाणूंशी थेट संपर्क येऊ नये म्हणून याहून प्रगत पीपीई वापरण्याची शिफारस केली आहे. मुंबई—पुणे सारख्या शहरांमध्ये हे पीपीई काही प्रमाणात उपलब्ध असले तरी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मात्र अजून पोहचलेले नाहीत. त्यामुळे एचआयव्हीचे पीपीई वापरून डॉक्टरांना उपचार करावे लागत आहेत.

यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या तीन करोनाचे रुग्ण दाखल आहेत. यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना एचआयव्हीचे पीपीई दिलेले आहेत. हे तुलनेने कमी सुरक्षित आहेत. मात्र उपलब्ध आहे ते वापरण्याशिवाय इथले डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पर्याय नाही, असे महाविद्यालयातील डॉक्टरांनी सांगितले.

मार्डची मागणी

नायर रुग्णालयात गेल्या आठवडय़ात १ लाख मास्कची मागणी केली होती. परंतु साडे सातशे उपलब्ध झाले आहेत. इथले निवासी डॉक्टरांसह आंतरवासिता विद्यार्थी निदानापासून उपचारापर्यतच्या कामावर नियुक्त आहेत. परंतु पुरेसे मास्क नसल्याने त्यांना मास्कचा पुनर्वापर करावा लागतो. हे धोकादायक आहे, असे निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या माजी अध्यक्ष डॉ. कल्यमणी नायर यांनी सांगितले.

कशाचा धोका?

*  एचआयव्हीचे पीपीई प्लास्टिकचे असून यातून रक्ताशी संबंध येणार नाही यादृष्टीने तयार केलेले असतात. परंतु करोनासारख्या शिंतोडय़ांमधून बाहेर पडणारे विषाणूंपासून संरक्षण होईल अशी रचना हवेतील संसर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या पीपीईमध्ये केलेली असते. यात डोळे, नाक, चेहरा पूर्णपणे झाकला जाईल आणि विषाणूंचा संसर्ग होणार नाही असे मास्क असतात. असे पीपीई फार कमी वेळा लागतात, त्यामुळे साठा करून ठेवला जात नाही. मात्र आता त्यांची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता भासणार असल्याने मागविणे अत्यावश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी मांडले.

*  पीपीई एकदा वापरल्यानंतर टाकून द्यावे लागतात. त्यामुळे पुरवून वापरण्यासाठी रुग्णांच्या थेट संपर्कात येणाऱ्या डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अधूनमधून एचआयव्हीचे पीपीईही वापरावे लागतात. यातून काही प्रमाणात विषाणूंची लागण होण्याचा धोका आहे. परंतु मुबलक साठा नसल्याने नाईलाज असल्याचे मिरजच्या शासकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी व्यक्त केले.

*  आमच्याकडे तर साधे सर्जिकल मास्क ही पुरेसे नाहीत. कोणत्याही वार्डमध्ये सॅनिटायजर उपलब्ध नाहीत. एन ९५ मास्कचा साठाही अपुरा असल्याने एकच मास्क चार ते पाच दिवस वापरावा लागत असल्याचे यवतमाळ  शासकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी सांगितले.