७८७ सुरक्षारक्षकांची फौज तैनात करण्याचा निर्णय; दोन वर्षांच्या सुरक्षेसाठी ४४.४२ कोटींचा खर्च

मुंबई : लोकमान्य टिळक रुग्णालयातील मूल चोरी प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, निवासी डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून झालेली मारहाण, त्यानंतर डॉक्टरांनी केलेले काम बंद आंदोलन लक्षात घेऊन प्रशासनाने चार मोठय़ा रुग्णालयांसह २३ रुग्णालयांचा आढाव घेऊन तेथे महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक महामंडळातील तब्बल ७८७ सुरक्षारक्षकांची फौज तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाकडून दोन वर्षे सुरक्षारक्षकांची सेवा घेण्यासाठी पालिकेला ४४.४२ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील मूल चोरी प्रकरण, निवासी डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून झालेली मारहाण, निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप या घटनांच्या पाश्र्वभूमीवर पालिकेने केईएम, लोकमान्य टिळक, नायर आणि डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक महामंडळातील

४०० सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते. मात्र ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरक्षा कर्मचारी संपावर गेले होते. त्यानंतर डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयात सुरक्षाव्यस्था पुरविण्यात आली नाही. उवरित तीन रुग्णालयांचा सुरक्षा कर्मचारी पुरवठय़ाचा करार ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

पालिकेने केईएम, लोकमान्य टिळक, नायर ही मुख्य रुग्णालये आणि जीटीबी, के. बी. भाभा (कुर्ला), कस्तुरबा, भगवती, कस्तुरबा (बोरिवली), स. का. पाटील, म. वा. देसाई, सिद्धार्थ,

संत मुक्ताबाई, महात्मा जोतिबा फुले, म. तु. अग्रवाल, वि. दा. सावरकर, माँ (चेंबूर), शताब्दी, राजावाडी, के. बी. भाभा (वांद्रे), व्ही. एन. देसाई, डॉ. आर. एन. कुपर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी या रुग्णालयांतील सुरक्षाव्यस्थेचा फेरआढावा घेण्यात आला. या रुग्णालयांमध्ये फक्त सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणाअंती या रुग्णालयांमध्ये ७८७ सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या २३ रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी १०२ मुख्य सुरक्षारक्षक, १०२ शस्त्रधारी सुरक्षारक्षक आणि ५८३ सुरक्षारक्षकांची फौज तैनात करण्यात येणार आहे. रुग्णालयांचे मुख्य प्रवेशद्वार व प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक, मुख्य सुरक्षारक्षक आणि शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सुरक्षाव्यस्थेसाठी पालिकेला प्रतिमहिना एककोटी ८५ लाख ९ हजार रुपये खर्च येणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक महामंडळाची सुरक्षाव्यस्था रुग्णालयांमध्ये एक वर्ष तैनात करण्यासाठी २२ कोटी २१ लाख आठ हजार रुपये, तर दोन वर्षांसाठी ४४ कोटी ४२ लाख रुपये १६ हजार रुपये पालिकेला मोजावे लागणार आहेत.

यापूर्वीची सुरक्षा खंडित

याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर केईएम, लोकमान्य टिळक, नायर या तीन रुग्णालयांमध्ये यापूर्वी नियुक्त केलेल्या ४०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.