15 October 2019

News Flash

अखेरच्या श्वासापर्यंत गात राहणार, निवृत्तीच्या अफवांवर लतादीदींचं उत्तर

गाणं हा माझा श्वास आहे त्यामुळे निवृत्तीचा प्रश्नच येत नाही असेही लता मंगेशकर यांनी म्हटले आहे

लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या निवृत्तीच्या अफवांवर आता उत्तर दिलं आहे. गाणं हा माझा श्वास आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत गातच राहणार त्यामुळे निवृत्तीचा प्रश्न येतोच कुठे? असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लता मंगेशकर यांचे ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणे व्हायरल झाले. या गाण्यासोबतच लता मंगेशकर या संगीतातून निवृत्ती घेणार असून या गाण्यानंतर लता मंगेशकर गाणार नाहीत, निवृत्ती घेणार आहेत. अशा आशयाचा मजकूरही व्हायरल झाला. मात्र या सगळ्या अफवा आहेत मी शेवटच्या श्वासापर्यंत गात राहणार असे लता मंगेशकर यांनी म्हटले आहे.

माझ्या निवृत्तीची अफवा कोणी पसरवली आणि त्या व्यक्तीचा यामागचा उद्देश काय होता? हे मला ठाऊक नाही. मात्र या सगळ्या अफवा आहेत. यावर लोकांनी मुळीच विश्वास ठेवू नये. काही दिवसांपासून मला निवृत्तीबाबत विचारणा करणारे फोन येत आहेत. काही रिकामटेकड्या माणसांनी माझे गाणे आणि त्यासोबत माझ्या निवृत्तीचा संदेश सोशल मीडियावर पसरवला त्यामुळे हे घडते आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत गात राहणार कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही लतादीदींनी स्पष्ट केलं आहे.

‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणं लता मंगेशकर यांनी पाच वर्षांपूर्वी गायलं होतं. हे गाणं कवी बा. भ. बोरकर यांची कविता असून या गाण्याला संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलं आहे. मी कधीही बा.भ. बोरकर यांची गाणी म्हटली नव्हती त्यामुळे मी या गाण्याला होकार दिला. पाच वर्षांनी याच गाण्याचा संदर्भ घेऊन माझ्या निवृत्तीच्या अफवा पसरवण्यात येतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं असंही लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. तसेच गाणं हे माझा श्वास असल्याने मी ते गातच राहणार शेवटच्या श्वासापर्यंत गाणार निवृत्तीचा काही प्रश्नच येत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर गाणं सोडणार, निवृत्त होणार याची सोशल मीडियावर आणि नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र लतादीदींनी या सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिल्याने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

First Published on December 6, 2018 7:42 pm

Web Title: seems like work of an idle mind says lata mangeshkar on retirement rumours