केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) विद्यार्थ्यांना पुढील वर्षांपासून इंग्रजी आणि संस्कृत या दोन भाषांचीही काठिण्य पातळीनुसार निवड करता येणार आहे. सीबीएसईने या दोन्ही भाषांचा दोन स्तरांवर पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय शिक्षण आराखडय़ानुसार  (एनईपी) विद्यार्थ्यांना अधिक विषयांचे पर्याय उपलब्ध व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्याच वेळी संस्कृत भाषेचा अभ्यास ऐच्छिक असला तरी त्याला प्रोत्साहन देण्याची अपेक्षाही धोरण मसुद्यात व्यक्त करण्यात आली आहे. नव्या आराखडय़ानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाची रचना करण्यात येत आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षेसाठी इंग्रजी आणि संस्कृत काठिण्य पातळीनुसार दोन स्तरांवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०२०-२१) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या गणित विषय दोन स्तरांवर उपलब्ध आहे.

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी पर्याय

* धोरण आराखडय़ानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे महत्त्व कमी करण्यात येणार आहे.

* सीबीएसईने गेल्या वर्षी काही प्रमाणात प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल केला. बहुपर्यायी आणि संकल्पनांचे उपयोजन करण्याचे विद्यार्थ्यांचे कौशल्य पडताळता येईल अशा स्वरूपाचे प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते. येत्या शैक्षणिक वर्षांपासून अशा स्वरूपाच्या प्रश्नांची संख्या वाढवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दरवर्षी अशा स्वरूपाच्या प्रश्नांचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढवण्यात येईल.

* पुढील शैक्षणिक परीक्षेपासून श्रेणीसुधार परीक्षेचा पर्यायही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

* राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबत देशभरातून सात हजारांहून जास्त सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला मिळाल्या आहेत. त्या अनुषंगाने अंतिम नियोजन करण्यात आले असून परीक्षा, अभ्यासक्रम यातील बदल टप्प्याटप्प्याने करण्यात येतील, असे केंद्रीय शिक्षण मंडळाने जाहीर केले.