करोना लसीकरणाची सराव फेरी राज्यात २ जानेवारीला होणार असून, त्यासाठी पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे बैठक घेतली. लसीकरणाच्या तयारीबाबत त्यात मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. निवड झालेल्या जिल्ह्यात प्रत्येकी तीन ठिकाणी सराव फेरी होईल. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष तयार केले जातील.  महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय येथे ही सराव फेरी होईल. नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाची सराव फेरी होईल.