म्हाडाच्या लॉटरी सोडतीनंतर घेण्यात येणाऱ्या शिबिरात पहिल्याच दिवशी दोन हजार अर्जदारांना स्वयंघोषणापत्राचे नमुने देण्यात आले आहेत. यात पात्रतेसंबंधित कागदपत्रे व स्वयंघोषणापत्राचे नमुने सादर केलेल्या अर्जदारांना पात्रतेचे पत्र, तसेच पैसे भरण्यासाठीचे देकारपत्र पहिल्याच दिवशी कोंकण मंडळाने देण्यास सुरुवात केली आहे.

लॉटरी सोडतीनंतर ते देकारपत्र हा प्रवास सध्या सर्वसाधारणपणे एका वर्षांचा आहे. त्यात सर्व कागदत्रांची पूर्तता केल्यानंतर हे पत्र देण्यात येते. वेळखाऊ प्रक्रिया कमी करण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यातील मार्गदर्शन शिबीर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संकेत क्रमांक २७०, २७१ व एकात्मिक / विशेष नगर वसाहत प्रकल्पाअंतर्गतच्या संकेत क्रमांक २७२ व २७५ मधील यशस्वी अर्जदारांसाठी राबविण्यात येत आहे.

म्हाडाच्या कोंकण मंडळाने ९ हजार घरांसाठी शनिवारी २५ ऑगस्ट रोजी लॉटरी सोडत काढली होती. या सोडतीनंतर २७ ऑगस्टपासून ते १ सप्टेंबपर्यंत पात्रता तपासणी विशेष शिबीर म्हाडा मुख्यालयात सुरू आहे. त्यात पहिल्या टप्प्यात पाच हजार अर्जदारांची पात्रता तपासली जाणार आहे. या शिबीराचे उद्घाटन म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांच्या हस्ते करण्यात आले.