News Flash

मुंबईत वाहनांसाठी ‘स्वयंघोषित’ पास

लाल, हिरव्या आणि पिवळया रंगात अत्यावश्यक सेवेशी संबंधित वाहनांची वर्गवारी करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा मार्ग मोकळा करण्यासाठी उपाय

मुंबई : शहरातील वाहतूक कोंडीत अत्यावश्यक सेवांशी संबंधित, विशेषत: आरोग्य सेवेशी संबंधित वाहने खोळंबू नयेत यासाठी प्रवासाच्या हेतूनुसार वाहनांना स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या स्वयंघोषित पास योजनेत वाहनांवर लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगांचे स्टीकर वाहनाचे मालक किंवा चालकांनी स्वत:च चिकटवणे अपेक्षित आहे. मुंबईच्या हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाला हे स्टीकर्स लावावे लागतील.

विनाकारण घराबाहेर पडलेल्यांमुळे शहरात, विशेषत: टोल नाक्यांवर वाहनांची कोंडी होते. त्यात प्राणवायू, अत्यावश्यक औषधसाठा वाहून आणणाऱ्या मालमोटारी, रुग्णवाहिका, डॉक्टरांसह आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहनेही खोळंबतात. त्यावर उपाय म्हणून स्वयंघोषीत पास (सेल्फ डिक्लेअर्ड पास) ही योजना सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी शनिवारी या योजनेबाबत माहिती दिली.

लाल, हिरव्या आणि पिवळया रंगात अत्यावश्यक सेवेशी संबंधित वाहनांची वर्गवारी करण्यात आली आहे. वाहन चालक किं वा मालकाने आपण कोणत्या वर्गात मोडतो हे लक्षात घेऊन त्या रंगाचा सहा इंची वर्तुळाकार स्टीकर वाहनाच्या पुढील व मागील काचेवर चिकटवणे अपेक्षित आहे. टोल नाके, नाकाबंदीदरम्यान पोलीस या तीन रंगांचे स्टीकर मोफत वितरित करणार आहेत.

गैरफायदा घेतल्यास गुन्हा

अत्यावश्यक सेवा किंवा निर्बंधांतून सवलत नसलेल्यांनी ‘स्वयंघोषित पास’ वाहनांवर चिकटवल्याचे लक्षात आल्यास फसवणुकीसह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल. त्यांच्यावर खटला चालविण्याच्या दृष्टीकोनातून कारवाई के ली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पास कोणासाठी?

लाल रंग : डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, रुग्णालये, प्रयोगशाळा किंवा निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, आरोग्य विमा अधिकारी, औषध उत्पादक कं पन्या, सॅनिटायझर आणि मुखपट्टी उत्पादक, वैद्यकिय उपकरणे, अन्य वैद्यकीय आणि आरोग्य सेवा या सेवांशी जोडलेले व्यवसाय आणि वाहतूकदार इत्यादींची वाहने.

हिरवा रंग : अन्नधान्य, भाज्या, फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादनाची वाहने, मिठाई उत्पादक आणि वाहतूकदारांची वाहने.

पिवळा रंग : केंद्र आणि राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या, पाणी पुरवठा, वीज आणि वायु पुरवठा करणाऱ्या कं पन्या, दूरसंचार कं पन्या, ई कॉमर्स कं पन्या (अत्यावश्यक वस्तू आणि सेवांसाठी मर्यादीत), शासकीय आणि खासगी सुरक्षा रक्षक पुरवठादार, बँक, एटीएम, वित्त आणि विमा कंपन्या, टपाल सेवा, पेट्रोल पंप, पेट्रोलियम पदार्थ उत्पादक, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कं पन्यांची कार्यालयांशी संबंधित वाहनांवर पिवळया रंगाचा स्टीकर असेल.

कठोर निर्बंध लागू असले तरी नागरिक त्यांची सर्रास पायमल्ली करीत आहेत. सुरुवातीचे दोन दिवस नागरिकांना समज देऊन, विनंती करून नियमांची जाणीव करून देण्यात आली. नागरिकांवर विनाचौकशी कारवाई करू नये, असे आदेश दिले होते. मात्र नागरिक त्याचा गैरफायदा घेत आहेत. आता अशा नागरिकांवर कारवाई के ली जाईल. – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 1:10 am

Web Title: self declared pass for vehicles in mumbai akp 94
Next Stories
1 मुंबईत ८,८३४ बाधित, ५२ रुग्णांचा मृत्यू
2 ‘आयआयटी’च्या माजी विद्यार्थ्यांची कंपनी अब्जाधीश!
3 मुंबई-पुण्यातील कर्मचाऱ्यांचे कार्य-पर्यटन
Just Now!
X