आकर्षक कंदिलांमुळे माटुंग्याच्या गल्लीत झगमगाट

शैलजा तिवले/ऋषीकेश मुळे

मुंबई : ‘सेल्फी’ने स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. रोजच्या जगण्यातील विविध क्षण ‘सेल्फी’तून टिपून त्यांची जपणूक करण्याकडे अनेकांचा ओढा असतो. हाच कल लक्षात घेऊन यंदाच्या दिवाळीत चक्क ‘सेल्फी’ किंवा कुटुंबाचे छायाचित्र लावून टांगता येणारे आकाशकंदील बाजारात दाखल झाले आहेत. त्यासोबतच कागदापासून काचेपर्यंत आणि प्लास्टिकपासून कापडापर्यंत विविध वस्तूंपासून बनवण्यात आलेले कंदील ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

आकाशकंदिलांचा मोठा बाजार म्हणून मुंबईतील माटुंग्याची कंदील गल्ली ओळखली जाते. दिवाळीचे वेध लागताच या गल्लीत आधी झगमगाट सुरू होतो. यंदाही आतापासूनच या गल्लीत दिवाळी दिसू लागली असून विविध प्रकारच्या कंदिलांनी हा बाजार सजला आहे. त्यातही ‘सेल्फी’ किंवा छायाचित्रे लावून मिळणारे कंदील लोकप्रिय ठरू लागले आहेत. माटुंग्यातील काही घरांत अशा प्रकारचे कंदील बनवून दिले जात असून त्यावर चार छायाचित्रे लावून हे कंदील साधारण ८०० ते एक हजार रुपयांना उपलब्ध होत आहेत.

याखेरीज रग कॅनव्हास किंवा प्लास्टिकच्या टोपल्यांचा वापर करून तयार केलेले झुंबरासारखे आकाशकंदील, लेझर पद्धतीने नक्षीकाम केलेले लाकडी कंदील, बांबूच्या काठय़ांनी बनवलेले कंदील यांना विशेष मागणी असल्याचे स्थानिक विक्रेते विनायक कांबळी यांनी सांगितले. पंधरा रुपयांपासून दोन-तीन हजारांपर्यंत हे कंदील उपलब्ध आहेत.

दिवाळीचे वेध लागताच माटुंग्याच्या कंदील गल्लीलाही नवा साज चढायला लागतो. इथले रहिवासीच घरी कंदील बनवून विकतात. हौस म्हणून एके काळी कंदील बनविण्याची कला इथल्या कादरीवाडी, नवलवाडी, राववाडी आदी ठिकाणी सुरू झाली. काळानुसार याचे स्वरूप बदलून आता इथे व्यवसाय सुरू झालेत. दिवाळीच्या सुमारे तीन महिने आधीपासूनच इथल्या वाडय़ांमध्ये कंदील बनविण्याची लगीनघाई सुरू होते. स्वत:च्या घरात व्यवसाय असला तरी शेजाऱ्यांनादेखील मदत करण्याची परंपरा इथल्या वाडीमध्ये अजूनही टिकून आहे, असे वाडीचे गुरुनाथ माने आवर्जून सांगतात.

‘जीएसटी’चा परिणाम

कंदिलासाठी लागणाऱ्या कागदावर या वर्षी जीएसटी म्हणजेच वस्तू, सेवा, कर लागल्याने कंदिलांच्या किमती सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच कंदिलासाठी लागणारा कच्चा माल धागा, बांबूच्या काडय़ा यांचे दरही वाढले आहेत. गेल्या वर्षी कागदाची जीएसटीमधून सुटका झाली होती. परंतु या वर्षी मात्र हा कर लागू झाल्याने कागद सुमारे २५ टक्क्यांनी महाग झाला आहे. साधा कागद १८ रुपये डझन या दराने मिळत असे. त्याची किंमत २७ रुपये झाली आहे. यावर आणखी जीएसटी त्यामुळे कंदिलाच्या निर्मितीच्या खर्चामध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कंदिलाच्या किमतीही दरवर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.