वांद्रे येथील समुद्रात सेल्फी काढताना झालेल्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर आता शहरातील धोकादायक अशा १५ ठिकाणी ‘सेल्फी-बंदी’ लागू केली जाणार आहे. अशा सर्वच धोकादायक ठिकाणांचा शोध घेण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. अशा ठिकाणी प्रत्येक वेळी सुरक्षा व्यवस्था ठेवणे शक्य नसल्यामुळे ‘नो सेल्फी झोन’ असे फलक लावून सेल्फीआधीनांना धोक्याचा इशारा देण्याचे पोलिसांनी ठरविले आहे.

सेल्फी काढताना वांद्रे येथे तीन तरुणी भरसमुद्रात पडल्या आणि त्यांना वाचविण्यासाठी गेलेले स्थानिक रहिवासी रमेश वाळुंज यांचा मृत्यू झाला. त्यापैकी तरन्नुम अन्सारीचा अद्याप शोध लागलेला नाही. अंजुम खान आणि मस्तुरी वासिम अली खान यांना वाचविणाऱ्या वाळुंज यांनी तरन्नुमला वाचविण्यासाठी पुन्हा समुद्रात उडी घेतली, परंतु त्यांचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी त्यांचा मृतदेह मिळाला. या घटनेमुळे सेल्फीपायी ओढवणारा धोका पुन्हा चर्चेत आला आहे.  वांद्रे दुर्घटनेनंतर अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेची मदत घेण्याचे पोलिसांनी ठरविले आहे. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याच्या मोहापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी महापालिका अशा ठिकाणी जीवरक्षक नेमू शकते, असे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

मागील वर्षी नाशिक येथे भरलेल्या कुंभमेळ्यातील काही ठिकाणेदेखील ‘नो सेल्फी झोन’ म्हणून घोषित झाली होती. धार्मिकदृष्टय़ा पवित्र असलेल्या या सोहळ्यात शाही स्नानाची पर्वणी साधण्यासाठी लाखो लोक सहभागी होतात. त्यात अनेकांना सेल्फी काढण्याची इच्छा अनावर होत असल्यामुळे  रहदारीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन दुर्घटनांची शक्यता वाढते. त्या पाश्र्वभूमीवर त्या ठिकाणी सेल्फी बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

दुर्घटनास्थळावरही सेल्फीगर्दी

वांद्रे येथे ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी मंगळवारीही अनेक तरुण-तरुणी सेल्फी काढण्यात गुंग होते. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडून त्यांना हटकले जात होते, परंतु पुन्हा ते सेल्फी काढण्यात गुंग होत होते.

चौपाटी-किल्ल्यांचा समावेश? 

पोलिसांनी १५ ठिकाणी सेल्फी बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, वांद्रे बँडस्टँड, शीव आणि वरळीचा किल्ला या पर्यटकांची पसंती असलेल्या ठिकाणांचाही समावेश असल्याचे समजते.