कुठेही गेलं की सेल्फी घ्यायचा हा सध्याचा ट्रेंडच आहे, स्मार्ट फोन ज्यांच्या हातात आहे ते कोणीही याला अपवाद नाहीत. अगदी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीही. होय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई-गोवा क्रुझवर अगदी टोकावर जाऊन सेल्फी घेतला. त्या एकट्याच अगदी टोकावर गेल्या आणि तिथे त्यांनी सेल्फी काढला. त्यांच्या सेल्फी प्रेमाचं कौतुक करायचं की जीव धोक्यात घातला म्हणून डोक्यावर हात मारून घ्यायचा या संभ्रमात पोलीस पडल्याचं दिसून आलं.

आजपासून मुंबई गोवा क्रुझ पर्यटन सेवा सुरु करण्यात आली. भाऊचा धक्का येथून आंग्रिया ही क्रुझ गोव्याच्या दिशेने रवाना झाली. या क्रुझला केंद्रीय बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवला. या कार्यक्रमाला मिसेस सीएम अर्थात अमृता फडणवीसही हजर होत्या. त्यावेळी त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. आता मिसेस सीएम यांचं सेल्फी प्रेम समजून घेता येऊ शकतं पण क्रुझच्या अगदी टोकाला जाऊन त्यांनी सेल्फी का काढला? याचीच आता चर्चा सुरु झाली आहे.

आज निघालेली आंग्रिया ही क्रुझ उद्या म्हणजेच रविवारी सकाळी पणजी येथील बंदरावर पोहचणार आहे. या क्रुझवर पर्यटकांसाठी शाही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावावरूनच या क्रुझचं नाव आंग्रिया असं ठेवण्यात आलं आहे. याच क्रुझला झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात मिसेस सीएम अर्थात अमृता फडणवीस यांनी सेल्फी घेतला. तो सेल्फी अशा एका ठिकाणाहून घेतला जे धोकादायक असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.