कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने समाजाच्या भल्यासाठी जीव ओतून देऊन काम करणारी ही सर्वसामान्य मंडळी अनन्यसाधारण अशी आहेत. ही मंडळी समाजाची खरी शक्ती असून त्यांचे काम पाहिले की निराश व्हायचे काहीही कारण नाही, ही खात्री पटते. ही माणसे समाजाची शक्ती असून त्यांच्यामुळे हिंदूवी स्वराज्य आणखी मोठे होणार आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शनिवारी येथे केले.
झी २४ तास वृत्तवाहिनीतर्फे २०१३चा ‘झी २४ तास अनन्य जीवनगौरव पुरस्कार’ केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत हॉटेल ताजमहाल येथे झालेल्या या कार्यक्रमाचे ‘दै. लोकसत्ता’हे माध्यम प्रायोजक होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना ‘झी २४ तास अनन्य सन्मान’ पुरस्काराने गौरविले गेले.
बाबासाहेब यांना पुरस्कार प्रदान करण्याअगोदर बाबासाहेब यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांनाही ‘झी २४ तास अनन्य जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रकृती अस्वाथ्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने हा पुरस्कार त्यांना त्यांच्या निवास्थांनी प्रदान करण्यात आला होता. त्याची चित्रफित या वेळी दाखविण्यात आली. ‘वनस्थळी’ या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाचा गौरव म्हणून निर्मला पुरंदरे यांचा सन्मान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना बाबासाहेब पुरंदरे पुढे म्हणाले की, आम्ही दोघांनी आजवर जे काही काम केले त्या कामासाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे आलेले आहेत. त्या सगळ्यांप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. समाजाच्या विविध क्षेत्रात जी माणसे काहीतरी विधायक काम करत आहेत, त्यांचे काम समाजापुढे आणण्याचे महत्वाचे काम या पुरस्काराच्या माध्यमातून ‘झी २४ तास’ वाहिनीचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. त्यांचे हे काम खूप मोलाचे आहे. फळाची अपेक्षा न करता कर्तव्य भावनेने काम करत राहून या माणसांनी भगवद्गीतेची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणली आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्फूर्तीदायक चरित्र लोकांना सांगण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले असून आपले संपूर्ण जीवन त्यांनी याच कामासाठी वाहून घेतले. देशात पूर्वीपासून मोगल, मौर्य, यादव आणि अनेकांची राज्ये होऊन गेली. त्यांची राजवट ही त्यांच्या नावाने ओळखली जाते. पण शिवाजी महाराज हे एकच राजे असे होऊन गेले की त्यांची राजवट भोसले या आडनावाने नव्हे तर ‘रयतेचे राज्य’ म्हणून ओळखली जाते.
समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या सर्व मंडळींनी आपल्या कामाने समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कामाची नोंद घेऊन त्यांना समाजापुढे आणण्याचे ‘झी २४’चे हे कामही स्तूत्य असल्याचे सांगून पवार म्हणाले की, या पुरस्काराच्या माध्यमातून समाजात सकारात्मक दृष्टीकोन वाढविण्याचे काम ही वृत्तवाहिनी करत आहे.
‘झी २४ तास अनन्य सन्मान’ पुरस्कार विजेते
हिरामण इंगोले (शिक्षण), जगदीश खरे (शौर्य), संपतराव पवार (पर्यावरण), ऋषिकेश ढाणे (कृषी), श्री जीवनज्योती बचतगट (समाजकार्य), राजेश जाधव (क्रीडा), बालाजी प्रासादिक नाटक मंडळी (मनोरंजन)