पश्चिम रेल्वेवर सध्या धावत असलेल्या एका वातानुकूलित लोकलनंतर आणखी दाखल झालेल्या बारा डबा वातानुकूलित लोकल चालवण्यात मोठा अडथळा आहे. संपूर्ण बारा डबा वातानुकूलित लोकल चालवण्यास प्रवाशांचा विरोध पाहता सामान्य लोकल गाडीला सहा किंवा तीनच वातानुकूलित डबे जोडण्याचा पर्याय पश्चिम रेल्वेसमोर आहे.

परंतु अशाप्रकारे डबे जोडण्याचे तंत्रज्ञानच पश्चिम रेल्वेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अर्ध वातानुकूलित लोकल तांत्रिक कचाटय़ात सापडली आहे. त्यामुळे ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेकडून होत आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल सेवेत आली. ही लोकल चालवण्यासाठी सामान्य लोकलच्या बारा फेऱ्यांवर गदा आली. त्यामुळे वातानुकूलित लोकलसाठी जादा भाडे देऊन प्रवास करण्यास प्रवाशांनी विरोधच दर्शविला. सामान्य लोकलच्या फेऱ्यांवरच गदा येत असल्याने प्रवाशांकडून अद्यापही वातानुकूलित लोकल गाडीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आणखी दोन वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेकडे दाखल झाल्या असून पहिली वातानुकूलित देखभाल-दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये नेण्यात आली. त्याऐवजी आलेल्या दुसरी वातानुकूलित लोकल चालवण्यात येत असून तिसऱ्या लोकलच्या काही तांत्रिक चाचण्या सुरू आहेत.

यासंदर्भात पश्चिम रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रवाशांचा विरोध व कमी प्रतिसाद पाहता बारा डबा वातानुकूलित लोकल चालवण्याचा मोठा पेच आहे. त्यामुळे बारा डबा लोकलमधील सहा किंवा तीन डबे काढून त्याऐवजी वातानुकूलित लोकलचे डबे जोडण्याचा पर्यायही आहे व रेल्वे मंत्रालयानेही तसे आदेश दिले आहेत. मात्र अशाप्रकारे डबे जोडणारे तंत्रज्ञान पश्चिम रेल्वेकडे नाही. त्यामुळे मोठी तांत्रिक अडचणही आहे. तांत्रिक अडचणींमुळे सामान्य लोकलमधील सहा डबेही काढणे योग्य नाही. पश्चिम रेल्वेसमोर प्रथम श्रेणीचे तीन डब्यांऐवजी वातानुकूलित लोकलचे डबे जोडण्याचा विचार आहे. पण त्यावरही अद्याप अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलो नसल्याचे सांगण्यात आले. या तांत्रिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न होत आहे.

बारा डबा लोकलमधील सहा किंवा तीन डबे काढून त्याऐवजी वातानुकूलित लोकलचे डबे जोडण्याचा पर्यायही आहे .मात्र अशाप्रकारे डबे जोडणारे तंत्रज्ञान पश्चिम रेल्वेकडे नाही. त्यामुळे मोठी तांत्रिक अडचणही आहे.