|| शैलजा तिवले

रुग्णांसाठीच्या कपडय़ांचाही साठा अपुरा

मुंबई : कोटय़वधी रुपये खर्च करून नव्याने बांधलेल्या भगवती रुग्णालयामध्ये ७५ टक्के वैद्यकीय आणि निमवैद्यकीय जागा रिक्त असल्याने अतिदक्षता विभागासह अनेक विभाग रखडले असल्याचा ठपका कॅगने अहवालातून ठेवला आहे. तसेच रुग्णांसाठीचे कपडे, बेडशीट, चादर इत्यादींचा साठा अपुरा सल्याचेही कॅगने अहवालातून निदर्शनास आणले आहे.

उपनगरातील वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेऊन विस्तार करण्याच्या दृष्टीने भगवती रुग्णालयाच्या जागी ११ मजली इमारत पालिकेने बांधली. २०१६ साली ११० खाटांचे रुग्णालयही सुरू केले. परंतु यात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या जागा रिक्त आहेत. निमवैद्यकीय विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट इत्यादी जागाही रिक्त आहेत. वैद्यकीय, निमवैद्यकीय अशा एकूण १०६ जागा मंजूर झालेल्या आहेत. यातील केवळ २६ जागा भरलेल्या आहेत. या उलट मात्र चतुर्थ श्रेणीवर्गातील वॉर्ड बॉय, सफाई करणारे कर्मचारी यांच्या ७० टक्के तर परिचारिका वर्गातील ६० टक्के जागा भरलेल्या आहेत. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे ११० खाटांमधील केवळ ४९ खाटा कार्यरत असल्याने त्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिकच असल्याचे कॅगने म्हटले आहे.

आपत्कालीन विभाग, पुरुष आणि महिला वार्ड येथे अनुक्रमे १४५, १६२ आणि ४३५ कपडय़ांचा तुटवडा आहे. असे असूनही जवळपास ३४९ कपडे २०१५ ते २०१९ या वर्षांत विनावापर पडून राहिलेले आहेत. तेव्हा तुटवडा असूनही यांचा वापर का केला गेला नाही, असा आक्षेप कॅगने अहवालात घेतला आहे.

पालिकेकडून धुवायचे कपडे नेण्यासाठी आठवडय़ातून एकदा गाडी येते. यातून धुऊन आलेल्या कपडय़ांमध्ये काही कपडे फाटलेले असतात. गरजेनुसार कपडय़ांचा पुरवठा करण्याची मागणी केलेली आहे, असे रुग्णालय प्रशासनाने कॅगच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

भगवतीचे दुर्भाग्य दिशादर्शक चिन्हांचा अभाव

नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांच्या दृष्टीने दिशादर्शक चिन्हे, रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती, वेळ इत्यादींचे फलक उपलब्ध नाहीत. रक्तपेढी, अग्नीसुरक्षा, पोलीस, रुग्णवाहिका इत्यादी आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यक असलेल्या सुविधांचे संपर्क क्रमांक प्रदर्शित केलेले नाहीत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने विद्युत, आग यासारख्या आपत्तींमध्ये मार्गदर्शन करणारे फलकही लावलेले नाहीत, असेही कॅगने अहवालात नमूद केले आहे.