एलपीजी गॅसधारक आणि शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी यांना आधार नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी केंद्र सरकारने घेतला. त्यानुसार राज्यात पुढील महिनाभर केवळ गॅसधारक आणि विद्यार्थ्यांचीच आधार नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात सामान्य नागरिकांनी नोंदणीसाठी आधार केंद्रावर जाऊ नये, असे आवाहन युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे उपसंचालक अजयभूषण पांडे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेला केले. आधार नोंदणीच्या वेळी लोकांना लुबाडणाऱ्या ३०० केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून काहींवर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आधार कार्ड नोंदणीवरून राज्यात सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गॅस सबसिडी आणि शिष्यवृत्तीचे फायदे मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीची अंतिम मुदत देण्यात आली होती.  तसेच राज्य सरकारनेही विविध योजनांसाठी आधार सक्तीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये खळबळ उडाली असून सर्वच आधार केंद्रांवर लोकांची झुंबड उडाली आहे. या पाश्र्वभूमीवर पांडे यांनी मंगळवारी हे आवाहन केले.
१५ मार्चपर्यंत मुदतवाढ
गॅसधारक आणि शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील महिनाभर मुंबई, पुण्यातील सर्व केंद्रांवर त्यांच्यासाठीच प्राधान्याने आधार नोंदणी केली जाईल. त्यामुळे सामान्य लोकांनी नोंदणीसाठी, जरी त्यांना वेळ देण्यात आली असली तरी आधार नोंदणीसाठी जाऊ नये. एखाद्या ठिकाणी गर्दी नसेल तरच नोंदणीसाठी जावे, असेही त्यांनी सांगितले. वर्धा, अमरावती, नंदूरबार या अन्य तीन जिल्ह्यांतही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.
३०० केंद्रांवर कारवाई
राज्यातील काही केंद्रांवर आधार कार्ड नोंदणीसाठी लोकांकडून पैशाची मागणी केली जाते, दलालांमार्फत नोंदणी केली जाते, तसेच नोंदणी केलेली माहिती आधापर्यंत पोहोचविण्यात टाळाटाळ केली जाते. अशा ३०० केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात आली असून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच काही संस्थांवर फौजदारी कारवाई करण्यात आल्याचेही अजयभूषण पांडे यांनी सांगितले. मुंबईतील सव्वाकोटी जनतेपैकी ७५ लाख लोकांना आतापर्यंत आधारचे वाटप करण्यात आले असून पुढील आठ महिन्यांत आणखी ५० लाख लोकांची नोंदणी केली जाईल. तसेच राज्यात ५ कोटी लोकांची नोंदणी झाली असून डिसेंबपर्यंत आधार केंद्र सुरू राहणार असल्याने लोकांनी आधार नोंदणीची चिंता सोडून द्यावी, असेही पांडे यांनी सांगितले.