नगरसेविकांच्या निलंबन प्रकरणावरुन पालिका सभागृहात सोमवारी गोंधळ सुरू होताच काँग्रेसच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिवसेनेवर शरसंधान केले. काँग्रेसच्या नकारात्मक भूमिकेमुळे सभागृहातील वातावरण बिघडल्याची सबब पुढे करीत भाजपने सभात्याग करीत प्रतिसभागृह भरविले. भाजप पाठोपाठ अन्य विरोधकांनीही महापौरांवर ठपका ठेवत सभात्याग केला. परिणामी, एकाकी पडलेल्या शिवसेनेला काँग्रेसच्या गोंधळी नगरसेवकांचा सामना करावा लागला.
पालिका सभागृहाची बैठक गोंधळात सुरू होताच काँग्रेसने गोंधळ सुरू केला. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर चर्चा झालीच पाहिजे’, ‘मुंबईकरांचे हित सभागृहातील चर्चेत आहे’ अशा घोषणांचे फलक झळकवले. त्याचवेळीभाजप गटनेते मनोज कोटक यांनी सभात्याग केला. महापौर स्नेहल आंबेकर सभागृह चालविण्यास असमर्थ असल्याचे भाजपने आपल्या कृतीतून दर्शवून दिल्यामुळे शिवसेनेच्या गोटात शांतता पसरली होती. तर काँग्रेस नगरसेवक अधिकच आक्रमक झाले. या एकूण पाश्र्वभूमीवर सेना एकाकीच पडली.