ओबामा भेटीच्यावेळी मोदींनी घातलेला सूट तब्बल चार कोटी ३१लाख रुपयांना लिलावात विकला गेला. त्यानंतर, मोदींच्या सूट लिलावावर टीका केली जात असतानाचं शिवसेनेने मात्र त्यांची पाठराखण केली आहे. केवळ मोदींनी तो सूट घातल्यामुळे त्याला लिलावात इतकी मोठी किंमत मिळाल्याचे शिवसेनेकडून म्हटले जात आहे.
सामना या वृत्तपत्राद्वारे मोदींच्या सूट लिलावाची पाठराखण करण्यात आली आहे. विरोधकांनी यावर टीका करण्याचे कारण नाही. जर काँग्रेसला यावर काही आक्षेप असेल तर त्यांनी राहुल गांधीचे कपडे, चपला लिलावास काढावे आणि त्याला किती दमड्या मिळतात ते पहावे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा मफलर तसेच, लालू प्रसाद आणि मुलायम सिंग यादव यांनी त्यांच्या वस्तू लिलावास काढाव्यात आणि किती बोली होते ते पहावे. तो सूट मोदींच्या अंगावर चढल्यामुळे त्याचे मोल वाढले. मोदींच्या सूट लिलावातून आलेल्या निधीचा उपयोग गंगा शुद्धीकरणासाठी होणार आहे. मोदींनी केवळ एकदा तो सूट परिधान केला आणि त्यासाठी बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, हिरा व्यापा-यांनी लिलावात बोली लावली. मोदी नेहमी नवे कपडे परिधान करतात. त्यातील काही कपडे लिलावासाठी काढले तर त्यामुळे भारतातील काळा पैसा बाहेर पडेल, असेही सामनात म्हटले आहे.