बिहारमध्ये आम्ही जदयूला आम्ही शब्द दिला होता तो आम्ही पाळला. महाराष्ट्रात शिवसेनेला शब्द आम्ही दिलाच नव्हता, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये भाजपने आधीच जाहीर केले होते, त्यानुसार जदयूचे नेते नितीशकुमार हेच मुख्यमंत्री झाले. बिहारमध्ये आज नितीश कुमार यांचा शपथविधी झाला. सलग सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. तर भाजपकडून दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली गेली.

याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर निवडक प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बिहारमध्ये कमी जागा येऊनही भाजपने नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्रीपद दिले आहे. मात्र इथे भाजपने दोन उपमुख्यमंत्रीपदे स्वत:कडे ठेवली आहेत. त्याबाबत प्रवीण दरेकर म्हणाले, भाजपने दोन उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय कोणत्याही दहशतीमुळे घेतलेला नाही. बिहार हे मोठे राज्य आहे. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले आहेत. त्यातही महिलांचे प्रश्न समजून घेऊन निर्णय घेण्यासाठी महिला उपमुख्यमंत्री देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्रात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटण्याच्या वादावरून भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली.

त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी भाजपने खोटे पाडल्याचा आरोप केला होता. भाजपने शिवसेनेला कुठलेही वचन दिले नव्हते नव्हते, असे म्हटले.