News Flash

भाजपच्या खेळीने सेनेचा मंत्री अडचणीत! परमार प्रकरणाला कलाटणी

परमार आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांना अटक झाली

भाजपच्या खेळीने सेनेचा मंत्री अडचणीत!  परमार प्रकरणाला कलाटणी

परमार आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांना अटक झाली असतानाच, पोलिसांनी उच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या कागदपत्रांवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्याच्या उद्देशानेच सरकारमधील उच्चपदस्थांच्या मान्यतेनेच कागदपत्रे उघड केली गेल्याचे बोलले जाते.

उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या परमार यांच्या डायरीमध्ये ई.एस. असा उल्लेख करण्यात आला आहे. हे ई.एस. कोण, अशी विचारणा न्यायालयाने केली असता त्याची चौकशी केली जाईल, असे विशेष सरकारी वकिलांकडून सांगण्यात आले. हे ‘ई.एस.’ कोण, याची चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्ह्य़ातील नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला जात आहे. ही चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली
आहे.
स्वत: शिंदे हे कमालीचे संतप्त झाले असून, त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेच्या नेतृत्वाकडे नापसंती व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली असताना शिंदे यांनी भाजपला रोख लावला होता. मतदानापूर्वी भाजपकडून शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करताना शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले होते व डोंबिवलीतील जाहीर सभेत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकून भाजप आणि मुख्यमंत्र्यांची जिरवली होती. याचाच बहुधा वचपा आता काढला जात असल्याची चर्चा आहे.
ठाणे पोलिसांकडून चार नगरसेवकांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये हा उल्लेख आहे. ई.एस. यांनाही पैसे दिल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. हा उल्लेख असलेली कागदपत्रे का सादर करण्यात आली, असा सवाल केला जात आहे. शिवसेनेला शह देण्याकरिताच ही खेळी केली गेल्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्य़ात शिंदे यांच्या खेळीने भाजपच्या वाढीवर ब्रेक लागला आहे. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर या शहरांमध्ये शिवसेनेपुढे भाजपचा टिकाव लागला नव्हता.

एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी
परमार यांच्या डायरीत ई.एस. आद्याक्षरे कोणत्या मंत्र्याकडे अंगुलिनिर्देश करतात हे स्पष्ट होते. या साऱ्या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी या उद्देशाने एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. शिंदे यांच्या राजीनाम्याकरिता काँग्रेस विधिमंडळात मागणी करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2015 5:26 am

Web Title: sena leader in trouble in parmar case due to bjp
Next Stories
1 पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खचलेला रस्ता आमचा नाही
2 महापालिकांच्या उधळपट्टीवर राज्य सरकारचा लगाम
3 महानगर टेलिफोन निगम कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन!
Just Now!
X