मुंबईत जाहीर करण्यात आलेल्या मांसविक्री बंदीच्या विरोधात मनसे आणि शिवसेनेने गुरुवारी दादरच्या आगर बाजारमध्ये कोंबडय़ा आणि मासळी विकून आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि काही काळानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मांसविक्री बंदीविरोधी आंदोलनाच्या निमित्ताने मनसे आणि शिवसेना एकत्र आल्याचे दिसत होते.
मीरा-भाईंदरच्या पाश्र्वभूमीवर मुंबईमध्ये दहा दिवस मांसविक्री बंदी लागू करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली एका संघटनेने पालिका आयुक्तांना सादर केले होते. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पर्युषण काळात १०, १३, १७ आणि १८ सप्टेंबर रोजी देवनार येथील पशुवधगृह बंद ठेवण्याचा आणि पालिकेच्या मंडईमध्ये मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश परिपत्रक जारी करून देण्यात आले होते. त्यास भाजपवगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पार्टीने कडाडून विरोध केला. गुरुवार, १० सप्टेंबर रोजी मुंबईत मांसविक्री बंदी करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ मनसेने दादरच्या आगार बाजारात कोंबडी विक्रीचा स्टॉल उभारला होता. मनसेचे कोंबडी विक्री आंदोलन सुरू होताच शिवसेनेच्या शाखाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली काही शिवसैनिक तेथे दाखल झाले आणि त्यांनी मासळी विक्री सुरू केली. उभयतांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता.