नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी महापालिकेत आरोप

महापालिकेतील नालेसफाई घोटाळ्यास केवळ काही अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार नसून त्याला पालिका आयुक्त अजय मेहताही तेवढेच जबाबदार आहेत, असा थेट आरोप शिवसेनेने केला आहे, तसेच या घोटाळाप्रकरणी आयुक्तांनी स्वत:हून राजीनामा द्यावा; अन्यथा आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव आणावा लागेल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
मेहता यांची आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात भाजपने पुढाकार घेतला होता. नालेसफाई घोटाळा उघडकीस आल्यानंतर आमदार आणि भाजपच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी महापालिका आयुक्तांचे जाहीर अभिनंदन केले होते. त्यामुळे शिवसेनेने आता आयुक्तांवर नेम साधत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
आयुक्तांच्या हुकूमशाहीमुळे पालिकेतील अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचा आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केला. नालेसफाईचे काम त्यांच्याच काळात सुरू झाले होते. त्यामुळे या घोटाळ्याची जबाबदारी केवळ काही अधिकारी आणि कंत्राटदार यांची नसून त्याला पालिका आयुक्तही तेवढेच जबाबदार असल्याचे फणसे यांनी सांगितले. राज्यात सरकार कोणाचेही असो मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतीलच अधिकारी महापालिकेत आयुक्त म्हणून आणला जातो, असेही फणसे यांनी सांगितले. नालेसफाईच्या चौकशीची मागणी कोणाही एका राजकीय पक्षाची नसून सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी या चौकशीची मागणी केली होती. शिवसेना आजही नालेसफाई झाली असल्याच्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले, तर नालेसफाईचे कोणतेही राजकारण केले जाऊ नये. अधिकारी व कंत्राटदारांवर होणाऱ्या कारवाईचे समर्थन करावे, असे प्रत्युत्तर अ‍ॅड. शेलार यांनी शिवसेनेला दिले आहे. आयुक्तांच्या मनमानीपणाबाबत मनसेने आवाज उठवला; मात्र तेव्हा शिवसेनेने त्याकडे दुर्लक्ष केले. आता हे प्रकरण शिवसेनेच्या अंगाशी आल्याने अविश्वास ठराव आणला जाणार आहे. आता हा ठराव आणण्याची हिंमत शिवसेनेने दाखवावी, अशी प्रतिक्रिया पालिकेतील ‘मनसे’चे गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली.