विरोधकांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौरांच्या निवासस्थानी करण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सर्व विरोधकांनी महापौर बंगल्यात हे स्मारक करण्यास विरोध करून मुख्यमंत्र्यावर टीका केली. तर सत्ताधारी शिवसेना-भाजपने या निर्णयाचे समर्थन केले. हा निर्णय न्यायालयाच्या कचाटय़ात सापडू शकतो, अशी बाब ‘मनसे’ने निदर्शनास आणून दिली. तर चर्चेच्या वेळी शिवसेना नगरसेवक मेराज शेख हे चक्कर येऊन सभागृहात कोसळले, त्यामुळे ही चर्चा थांबविण्यात आली. शेख यांच्या मेंदूत रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) झाला आहे. शेख यांची प्रकृती चिंताजनक असून ते कोमात गेले आहेत.
‘मनसे’चे गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले, १८ ऑक्टोबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्या बैठकीत नवी दिल्ली येथील शासकीय बंगले स्मारकासाठी न देण्याचा निर्णय आहे. या निर्णयाचा आधार घेऊन कोणी न्यायालयात गेले तर हा निर्णय कायद्याच्या कचाटय़ात सापडू शकतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी महापौर निवासात स्मारक न करता ते ‘मातोश्री’ निवासात करावे, असे सांगून महापौर बंगला स्मारकासाठी देऊन मुख्यमंत्र्यांनी चुकीचा पायंडा पाडला असल्याची टीका केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवसेनेच्या नेत्यांना मुंबईत भूखंड मिळू शकला नाही ही खेदाची बाब असल्याचे सांगितले.

‘भाजप’चे गटनेते मनोज कोटक, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे आदींनी या निर्णयाच्या समर्थनार्थ भाषणे केली. ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्यांना शिवसैनिक बाहेर फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक मेराज शेख यांनी दिला. आपले भाषण संपवून ते खाली बसले आणि त्यांना चक्कर आल्याने सभागृहाचे कामकाज थांबविण्यात आले. डॉक्टरांनी शेख यांची तपासणी केल्यानंतर त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल केले.