लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘गृहनिर्माण व नागरी व्यवहार’ खात्याने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’मध्ये मुंबई महापालिका सहभागी झाली असून शौचालयांची योग्यस्थिती आणि देखभालीच्या निकषांवर शहरांना या अभियानात ‘हागणदारीमुक्त ++’ दर्जा मिळविता येणार आहे. या संदर्भात नागरिकांकडून आक्षेप अथवा सूचना पाठविण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबईत विविध ठिकाणी असलेल्या सात हजार २१२ शौचालयांमध्ये ८७ हजार ४२२ शौचकुपे वापरात आहेत. ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत मुंबई शहर ‘हागणदारीमुक्त ++’ करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागामार्फत ‘कंत्राट लॉट – ११ (आर)’ अंतर्गत स्वत:च्या हद्दीतील एकूण एक हजार १६८ सामुदायिक शौचालयांमध्ये २२ हजार ७७४ शौचकुपे बांधणे प्रस्तावित आहेत. त्यापैकी १३९ सामुदायिक शौचालयांमध्ये २ हजार ८२० शौचकुपे बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच ५७७ सामुदायिक शौचालयांमध्ये १३ हजार ९९८ शौचकुपे बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

मुंबई महापालिका ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’अंतर्गत असलेल्या निकषांच्या अधीन राहून ‘हागणदारीमुक्त ++’साठी नागरिकांनी आक्षेप अथवा सूचना पाठवाव्यात.  नागरिकांनी आपले आक्षेप, सूचना  greenmumbai.report@gmail.com या ई—मेल पत्त्यावर १४ डिसेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी कळवाव्यात, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.