09 March 2021

News Flash

प्रत्येक जिल्ह्य़ात ज्येष्ठ नागरिक कक्ष

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

प्रातिनिधिक छायाचित्र

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

वृद्धांसाठी असणाऱ्या सर्व योजना एकाच छताखाली आणून त्या योजनांचा लाभ संबंधित वृद्धांना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ाच्या सामाजिक न्याय भवनमध्ये स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी स्थापन करण्यात येईल, असे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी जाहीर केले.

ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबत सरकारच्या विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक समितीची बैठक झाली. त्या वेळी बडोले बोलत होते. या वेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपिन मल्लिक, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, ज्येष्ठ नागरिक कृती समितीचे पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धापकाळ चांगला व्यतीत व्हावा, समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य़ व्हावे, शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी सरकारने ‘ज्येष्ठ नागरिक धोरण’ जाहीर केले आहे. या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी सर्व विभागांनी करावी, असे बडोले यांनी सांगितले.

प्रत्येक विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे निर्देशही बडोले यांनी दिले.

ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळविण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करून आपत्कालीन यंत्रणा सतर्क करणारी यंत्रणा विकसित करण्यात येईल. यासाठी प्रतिसाद सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल. पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांवर मैत्रीपूर्ण लक्ष ठेवावे. ज्येष्ठ नागरिकांचा विद्यापीठे, ग्रंथालये, संशोधन संस्था आणि सांस्कृतिक केंद्रे यांच्याशी संपर्क व सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. राष्ट्रीय दिवसांच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येईल, अशी माहिती बडोले यांनी दिली.

वृद्धाश्रमांसाठी लवकरच नवीन धोरण

वृद्धाश्रमांची नोंदणी, मूल्यांकन, सनियंत्रण व त्यांना साहाय्य यासाठी लवकरच नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे, असेही राजकुमार बडोले यांनी जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:26 am

Web Title: senior citizen center
Next Stories
1 कट्टरवाद्यांना कर्नाटकमधून शस्त्रसाठा?
2 मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर १७ पादचारी पूल
3 वडाळा आगार नृत्य प्रकरण – अभिनेत्री माधवी जुवेकरसहित बेस्टचे सात कर्मचारी बडतर्फ
Just Now!
X