अमर सदाशिव शैला

मुंबईतील काही रुग्णालयांनी करोनाच्या धास्तीमुळे तर काहींनी करोनाबाधितांवरच उपचार करतो, असे सांगत दाखल करून घेण्यासच नकार दिल्याने एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा घरीच उपचाराविना मृत्यू झाला.

ओमप्रकाश शुक्ला यांना श्वास घेण्यात अडचणी येत असल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम उपनगरातील थुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने त्यांना इतरत्र हलविण्यास सांगितल्याची माहिती शुक्ला यांचे जावई जगदीश मिश्रा यांनी दिली. परिणामी बुधवारी सायंकाळी शुक्ला यांचा मुलगा विनय आणि जावई यांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र बहुतांश खासगी आणि सरकारी रुग्णालयांनी करोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे कारण देत उपचार करण्यास नकार दिला. तर काहींनी आयसीयूत जागा नसल्याचे कारण दिले.

मालाडमधील एका नामांकित रुग्णालयाने शुक्ला यांना श्वसनास त्रास होत असल्याने करोनाचा संशय व्यक्त करत उपचारास नकार दिला. करोनाची लागण झाली नसल्याचा अहवाल आणा. तरच उपचार करू, असे या रुग्णालयाने नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी पुन्हा शुक्ला यांना थुंगा रुग्णालयात आणले. मात्र आयसीयूत जागा नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. शुक्ला यांना दाखल करून घेण्यास रुग्णालये तयार न झाल्याने त्यांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथेही के वळ करोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे कारण पुढे करत नकारघंटा वाजवली. अखेर सर्व पर्याय निष्फळ ठरल्याने रात्री साडे अकरा वाजता शुक्ला यांना घरी आणण्यात आले. घरीच ऑक्सिजन सिलिंडर त्यांना लावण्यात आला. मात्र काही वेळातच शुक्ला यांची प्राणज्योत मावळल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

शुक्ला यांना घेऊन कुटुंबीयांनी जवळपास ८ ते १० रुग्णालयात चकरा मारल्या. मात्र त्यांना कुणीच दाखल करून घेतले नाही. वेळीच उपचार मिळाले असते त्यांचा मृत्यू ओढावला नसता, असा आरोप जगदीश मिश्रा यांनी केला.

याबाबत थुंगा रुग्णालयाशी संपर्क साधला असता रितेश शेट्टी यांनी, ८ एप्रिलला शुक्ला यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठविल्याचे मान्य के ले. तसेच, रुग्णालयाने के लेल्या शुक्ला यांच्या करोना चाचणीचा अहवालही नकारात्मक आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र उपचार का दिले नाहीत, या प्रश्नावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.