13 December 2017

News Flash

जितेंद्रच्या भेटीने ज्येष्ठांची जिवाची मुंबई

सदाबहार हिरो, जितेंद्रच्या भेटीने जीव हरकून गेला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 17, 2017 3:26 AM

सदाबहार हिरो, जितेंद्र

वयाची साठी ओलांडली तरी, अजून मुंबई बघितली नाही. राज्य सरकारातील एका राज्य मंत्र्याकडे मनातील ही खंत ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखविली. मंत्र्यांनी मग त्यांचा शासकीय शिस्तीने मुंबईचा दौरा आयोजित केला. आपल्या एका स्वीय सहाय्यकावर त्याची जबाबदारी टाकली. साठी पार केलेले साठ ज्येष्ठ नागरिक मुंबईत दाखल झाले. येथील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. चार दिवस जीवाची मुंबई केली. परंतु त्यांच्या जमान्यातील सदाबहार हिरो, जितेंद्रच्या भेटीने जीव हरकून गेला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

विदर्भातील यवतमाळ हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्य़ातील दारव्हा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार संजय राठोड महसूल राज्यमंत्री आहेत. एके दिवशी काही ज्येष्ठ नागरिक त्यांना भेाटायला गेले. त्यात काही शासकीय सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी होते, तर बहुतांश शेतकरी होते. साठी पार झाली, परंतु अजून आम्ही मुंबई पाहिली नाही, अशी खंत त्यांनी मंत्र्यांजवळ बोलून दाखविली. मंत्र्यांनीही त्यावर अधिक चर्चा न करता, त्यांच्या मुंबईच्या दौऱ्याची आखणीच केली.

१२ सप्टेंबरला साठ ज्येष्ठ नागरिक मुंबईत रेल्वेने दाखल झाले. दादर येथील एका संस्थेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गेट वे ऑफ इंडिया, मुझियम, विधान भवन, चौपाटय़ा, नेहरु तारांगण, अशी वेगवेगळी मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे बघून त्यांना अत्यानंद झाला. मंत्रालयात छायाचित्रे काढली. मुंबई भेटीत त्यांनी अभिनयाचा बादशहा अमिताभ बच्चन आणि सदाबाहर हिरो जितेंद्र यांना भेटता यावे, अशी इच्छा प्रकट केली होती. परंतु अमिताभ बच्चन यांची भेट होऊ शकली नाही. जितेंद्र यांनी मात्र ग्रामीण भागातून आलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या घरी मनपूर्वक स्वागत केले. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या, छायाचित्रे काढली. आमच्या जमान्यातील जितेंद्र आमचा हिरो. त्याच्या भेटीने तरुणपण आठवले. आमची खऱ्या अर्थाने जीवाची मुंबई झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

First Published on September 17, 2017 3:26 am

Web Title: senior citizen from yavatmal meet jitendra during mumbai visit