दादरच्या कोहिनूर वाहनतळात पालिकेच्या नव्या उपक्रमाला सुरुवात

मुंबई : ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना करोना प्रतिबंध लस घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी मुंबई महापालिकेने दादरमधील बहुमजली कोहिनूर स्क्वेअर इमारतीमधील सार्वजनिक वाहनतळात ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ सुरू केले असून वरिष्ठ नागरिक आणि शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना गाडीत बसूनच लस घेता येणार आहे. देशातील हे सर्वात पहिले लसीकरण केंद्र ठरले आहे.

मुंबईकरांचे शक्य तितक्या लवकर लसीकरण करण्याकडे पालिकेचा कल आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात येत आहे. मात्र लसीचा मर्यादित साठा उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहिमेत अडथळे आहेत. लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. अनेक वरिष्ठ नागरिक आणि शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्ती लस घेण्यासाठी केंद्रावर जातात. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे त्यांचे लसीकरण होत नाही. केंद्रावरील गर्दीमुळे त्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन ‘ड्राइव्ह इन करोना लसीकरण केंद्र’ उभारण्यात आले आहे. दादरच्या कोहिनूर स्क्वेअर या बहुमजली इमारतीमधील सार्वजनिक वाहनतळामध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राचे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी आमदार सदा सरवणकर, पालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

गाडीमध्ये बसून ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना करोना प्रतिबंध लस घेता येणार आहे. दिवसभरात सुमारे २५० गाड्यांमधील नागरिकांना लस घेता येईल. तूर्तास केवळ ४५ वर्षांवरील सर्वांनाच येथे लस घेता येणार आहे. या केंद्रावर १८ वर्षांवरील सर्वांना लस घेता यावी यासाठी लवकरच सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न पालिका करत आहे. या वाहनतळात ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्रा’व्यतिरिक्त लसीकरणासाठी सात कक्ष उभारण्यात आले असून तेथे दिवसभरात चार हजार नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

कोहिनूर स्क्वेअरमधील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईतील अन्य ठिकाणच्या सार्वजनिक वाहनतळांमध्येही ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.