मुंबई : गेल्या सहा दशकापासून चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांच्या चेहऱ्याला रंग लावत त्यांना अधिक सुंदर करणारे ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे सोमवारी मुंबईतील सिद्धिविनायक रुग्णालयात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि त्या कलाकारांच्या चेहऱ्याचा पोत ओळखून रूपडे पालटण्यासाठी पंढरीनाथ जुकर यांचा हातखंडा होता. गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होते. दहा दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

पंढरीनाथ जुकर यांनी १९४९ मध्ये व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत काम सुरू केले. दिग्गज रंगभूषाकार उस्ताद बाबा वर्धन आणि राजा परांजपे यांच्याकडे रंगभूषेचे धडे घेतल्यावर के. ए. अब्बास यांच्यासोबत ‘परदेसी’ चित्रपटासाठी रशियाला गेले. एक वर्ष मॉस्को येथून रंगभूषेचे रीतसर प्रशिक्षण घेऊन भारतात परतल्यावर त्यांनी ‘झनक झनक पायल बाजे’, ‘चित्रलेखा’, ‘ताजमहल’, ‘शोले’, ‘नागीन’, ‘मिस्टर इंडिया’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यासह पाचशेहून अधिक चित्रपटांसाठी रंगभूषाकार म्हणून काम केले. मीना कुमारी, मधुबाला, देव आनंद, राज कुमार, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, आमिर खान, विद्या बालन या कलाकारांना त्यांनी आपल्या रंगभूषेच्या कौशल्याने पडद्यावर अधिक सुंदर बनवले आहे. त्यांनी केलेला मीना कुमारीचा ‘चार दिल चार राहें’ या चित्रपटातील आणि ‘हम पाँच’ मालिकेतील अभिनेत्री प्रिया तेंडुलकरचा ‘लूक’ विशेष गाजला. ‘स्टार इन्स्टिटय़ूट’च्या माध्यमातून त्यांनी रंगभूषाकारांची तरुण पिढी घडवली. यश चोप्रांबरोबर त्यांनी सलग १७ वर्षे काम केले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल २०१३ मध्ये त्यांना व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आले होते.