विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी कोण बसणार याचे अंदाज वर्तवले जात होते. ज्यानंतर विजय वडेट्टीवार यांचे नाव समोर आले. त्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. तसेच विजय वडेट्टीवार यांनी कशा प्रकारे कामं केली, उपक्रमशीलता हा त्यांच्या स्वभावाचा विशेष आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारचा कारभार नीट चालावा यासाठी सक्षम विरोधी पक्षनेत्याचीही गरज असते. धोरणात्मक विरोध करून विजय वडेट्टीवार त्यांची भूमिका योग्य पद्धतीने निभावतील अशी खात्री वाटत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

गेली अनेक वर्षे या सभागृहाचे ते सदस्य आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली. काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना संधी देतो आणि निवडणूक संपल्यावर त्यांना बाजूला करून दुसऱ्याला संधी दिली जाते. मात्र मला विश्वास आहे की आता विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने पुढेही वडेट्टीवारांना संधी द्यावी असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या कुणाला तरी संधी द्यायची असं करू नका. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच तुम्ही फोडाफोडीचं राजकारण करू नका असं विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी मिश्किल उत्तर दिलं. फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक कोण आहेत ते आठवा असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला. २०१४ पासून काँग्रेस पक्षाचे उपनेते म्हणूनही विजय वडेट्टीवार काम करत होते. विविध समित्यांवर आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं कार्य मोठं आहे असंही मुख्यमंत्री म्हटले.

एखादं काम हातात घेतल्यानंतर मागे लागून ते काम पूर्ण करायचं ही त्यांची हातोटी आहे. मला असं वाटतं की चंद्रपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा जो एकमेव खासदार निवडून आला त्यामध्ये वडेट्टीवार यांची जी भूमिका होती ती पाहता काँग्रेस पक्षाने त्यांना प्रमोशन दिलं आहे. गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठीही विविध उपक्रम वडेट्टीवार चालवत असतात असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.