ज्येष्ठ अर्थविश्लेषक व स्तंभलेखक शांताराम मंगेश गोठोस्कर यांचे सोमवारी सकाळी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी अपर्णा, मुलगा भरत, मुलगी प्राजक्ता पांढरे, सून, जावई व दोन नाती असा परिवार आहे. दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.
मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडीत झाल्यानंतर शां. मं. गोठोस्कर यांना १८ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ दिवसांपासून ते कोमातच होते. अखेर आज सकाळी ८.४५ वाजता चर्नी रोड येथील मोतीबेन दळवी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. सहकार क्षेत्रातील आघाडीच्या सारस्वत बँकेवर गोठोस्कर दोन वेळा निवडून गेले होते. महाराष्ट्र शासनाच्या राज्य वित्त महामंडळावरही (महावित्त) ते संचालक म्हणून होते.
सहकार, आर्थिक तसेच अनेक राजकीय घडामोडींवरील त्यांचे लेखन ‘लोकसत्ता’सह विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी सर्वप्रथम मुंबई – बंगळुरु दरम्यान ‘ब्रॉडगेज’ रेल्वेमार्गाची कल्पना मांडली होती. तिहारी धरण बांधकामाच्या वेळी दाखविलेल्या प्रत्यक्ष सहभागामुळे सुमारे १० हजार लोकांचे विस्थापन रोखले गेले.