मानवी जीवन व त्यातील संघर्षांला आपल्या कवितेतून आस्थेने मांडणारे हिंदीतील ज्येष्ठ कवी चंद्रकांत देवताले यांचे सोमवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.

स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी कवितेत ‘नयी कविता’ अवतरली व लगतच्या काळात हिंदीत काव्याचे नवनवे प्रवाह निर्माण झाले. ‘अकविता’ हा त्यातीलच एक सशक्त प्रवाह. या प्रवाहाचे प्रतिनिधी असलेले चंद्रकांत देवताले यांच्या कवितांनी मानवी जीवनातील संघर्षांला प्रभावीपणे अधोरेखित केले. मध्यप्रदेशातील जौलखेडामध्ये १९३६ साली त्यांचा जन्म झाला.  पुढे इंदोर  व सागर येथे शिक्षण व नंतर इंदोरमध्ये अध्यापनाच्या क्षेत्रात ते कार्यरत होते. याच काळात त्यांच्या कवितेने लक्ष वेधून घेतले. १९७३ मध्ये ‘हड्डियों में छिपा ज्वर’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतरच्या ‘दीवारों पर खून से’ (१९७५) व ‘लकडबग्घा हँस रहा है’ (१९८०) या संग्रहांनी त्यांच्या कवितेला हिंदी कवितेत महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. २०११ साली त्यांचा ‘पत्थर फेंक रहा हूँ’ हा संग्रह प्रकाशित झाला. या संग्रहासाठी २०१३ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

आधुनिकीकरण, विकास, जागतिकीकरण या प्रक्रियेत निर्माण झालेले वंचित, शोषितांचे प्रश्न देवताले यांनी कवितेतून मांडले. आपल्या काळातील सामाजिक-राजकीय जीवनाविषयीचे परिपक्व तत्त्वभान त्यांच्या कवितेत प्रतिबिंबित झाले आहे. अकवितेतील निषेधभाव त्यांनी प्रभावीपणे मांडला.  इतर भाषिक कवींशी, विशेषत: मराठीतील महत्त्वाच्या कवींशी त्यांचे दृढ संबंध होते. अलीकडेच त्यांनी संत तुकारामांच्या अभंगांचा हिंदीत अनुवाद केला होता. त्यांच्या निधनाने हिंदी व मराठी कवितेतील दुवा हरपल्याची भावना साहित्यजगतातून व्यक्त होत आहे.

साहित्यसंपदा

  • ‘हड्डियों में छिपा ज्वर’ (१९७३)
  • ‘दीवारों पर खून से’ (१९७५)
  • ‘लकडबग्घा हँस रहा है’
  • ‘रोशनी के मैदान की तरफ’
  • ‘हर चीज में आग बतायी गयी थी’ (१९८७),
  • ‘पत्थर की बेंच’ (१९९६),
  • ‘उजाड में संग्रहालय’ (२००३)
  • ‘पत्थर फेंक रहा हूँ’ (२०११)