25 November 2020

News Flash

भाषा सहज येत नाही, घडवावी लागते!

‘चौकात उधळले मोती’ ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात अंबरीश मिश्र यांचे प्रतिपादन

‘चौकात उधळले मोती’ ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला लेखक अंबरीश मिश्र, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे शरद काळे आणि आमदार आशीष शेलार उपस्थित होते.

‘चौकात उधळले मोती’ ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात अंबरीश मिश्र यांचे प्रतिपादन

मुंबई : भाषा केवळ येऊन चालत नाही तर ती आत्मसात करावी लागते. ती आली म्हणजे आपल्याला भाषेतील सगळेच समजते असे नाही. भाषेच्या आकलनाची प्रक्रिया सहज नसून तिला अखंड मेहनतीनेच घडवावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अंबरीश मिश्र यांनी केले.

राजहंस प्रकाशनातर्फे मिश्र यांच्या ‘चौकात उधळले मोती’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, आमदार आशीष शेलार आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे शरद काळे यांच्या हस्ते झाले.

या पुस्तकाच्या काही अंशाचे वाचन या वेळी करण्यात आले. प्रकाशनप्रसंगी उपस्थित असलेल्या नेत्यांनी राजकीय मतभेद विसरून एकमेकांना कोपरखळ्या मारत कार्यक्रमात रंगत आणली. उर्दू भाषेचा मिश्र यांच्या अनुभवातून धांडोळा घेण्याच्या प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला असून या ग्रंथाचे  मुखपृष्ठ नीलेश जाधव यांनी केले आहे.

यावेळी  मिश्र म्हणाले की, उर्दूविषयी अनेक गैरसमज आपल्या मनात आहेत. तीही साधी सरळ भाषा आहे. कोणतीही भाषा अथक परिश्रमानंतर आत्मसात होते.  ग्रामीण मराठी समजून घेण्यात आपण कमी पडतो. जागतिकीकरणाने भाषा, भावना, संवेदना या सगळ्यावर वरवंटा फिरवला आहे.  या प्रकाशन सोहळ्याचे दिग्दर्शन दिग्दर्शक विश्वास सोहनी यांनी केले.

‘आरजे’ रश्मी वारंग आणि पत्रकार विवेक सुर्वे आणि सुप्रिया सुळे यांनी पुस्तकातल्या काही अंशाचे वाचन केले. पत्रकारितेचा अनुभव, उर्दूतून मिळालेली समृद्धता, भाषेविषयीची ओढ या पुस्तकांच्या केंद्रस्थानी जाणवते, असा मान्यवरांनी गौरव केला.

मान्यवरांची उपस्थिती

टाळेबंदीनंतर अनुभवलेला हा पहिला सोहळा आहे, ज्यामध्ये भाषा, शेर, विनोद, भेटीगाठी यांचा अनुभव घेता आला. अशी भावना प्रत्येक मान्यवरांच्या ओठी होती. या सोहळ्यास राजकीय नेत्यांसह सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, विविध माध्यमांतील वरिष्ठ पत्रकार, लेखक, कवी, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

राजकीय टोलेबाजी.. : पुस्तकाचे नाव वाचताना चौकात उधळले ‘मोदी’ असा उच्चार करून शेलार यांनी मंचावर असलेले भाजपचे प्रस्थ स्पष्ट केले. तर आम्ही सामाजिक अंतर राखून उभे आहोत असा इशारा सुप्रिया सुळेंनी पत्रकारांना दिला. त्या वेळी ‘इतके सामाजिक अंतर गरजेचे आहे’ असेही त्यांनी शेलारांना सूचकतेने सांगितले. तसेच ‘लोकसत्ता’चा दाखला देत वर्तमानपत्रांनी आम्हाला घडवलं, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुस्तकाचा आत्मा उर्दू भाषेत दडलेला असल्याने ‘मी हल्ली उर्दू कार्यक्रमांना जास्त जातो, कारण माझा मतदारसंघ वांद्रे पश्चिम आहे.’ या शेलारांच्या वाक्याला टाळ्यांची दाद मिळाली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 3:32 am

Web Title: senior journalist and writer ambarish mishra in book publishing ceremony zws 70
Next Stories
1 सिटी सेंटर मॉलमधील अग्नितांडवाशी ३९ तास झुंज
2 शिथिलीकरणानंतर गृहविक्रीत वाढ
3 Dussehra 2020 : व्यावसायिकांना ‘सुवर्णदायी’ आशा
Just Now!
X