ज्येष्ठ पत्रकार राम प्रधान यांचे बुधवारी कळवा येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

राम प्रधान यांनी काही काळ दै. ‘लोकसत्ता’मध्ये उपसंपादक, दै. ‘सकाळ’मध्ये सहसंपादक म्हणून काम केले होते. अनेक शैक्षणिक संस्थांवर विश्वस्त म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांनी १९४८ पासून मुंबई, गोवा नभोवाणीचे विविध विषयांचे विपुल, वृत्तपत्रीय लेखन, तसेच अनेक मासिकांत व दिवाळी अंकांमध्ये १९५२ पासून लेख, कविता, कथा, वैचारिक लेख लिहिले होते.

‘महात्मा गांधी : एक शोध’ हे त्यांचे अलीकडेच प्रसिद्ध झालेले पुस्तक, ‘आंबेडकरवाद- काल- आज- उद्या’ या त्यांच्या ग्रंथाला मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार व राज्य सरकारचा २००७-०८ चा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.