कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ पत्रकार वसंत प्रधान यांचे रविवारी दीर्घ आजाराने त्यांच्या खार येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
प्रधान यांच्या पश्चात पत्नी अ‍ॅड. किसन, कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती निशिता म्हात्रे आणि येल विद्यापीठात संशोधक असलेल्या दीप्ती प्रधान या दोन कन्या आणि मुलगा संगीतकार अनिष, स्नुषा शुभा मुद्गल, नातवंडे असा परिवार आहे.
प्रधान यांचा जन्म १६ जानेवारी, १९२४ चा. पण, विद्यार्थीदशेत असतानाच त्यांनी १९४२च्या ‘छोडो भारत’ चळवळीत भाग घेतला होता. त्यात त्यांना अटकही झाली होती. वसंत प्रधान यांचे वडील पोस्ट खात्यात होते. वडिलांच्या सततच्या बदलीमुळे प्रधान यांचे शिक्षणही अलिबाग, जळगाव, मुंबई, बडोदा अशा वेगवेगळ्या शहरांमधून झाले. त्यांनी कला विषयात करिअर करायचे ठरविले असतानाच त्यांचा संबंध विद्यार्थी आणि कामगार चळवळींशी आला.
काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर स्थापन झालेल्या समाजवादी पक्षात ते कार्यरत होते. त्यानंतर स्थापन झालेल्या मिल मजदूर संघाचे ते पूर्णवेळ कार्यकर्ते होते. १९५६ साली यांनी पत्नी किसन यांच्या मदतीने ‘झुंजार’ हे मराठी दैनिक सुरू केले. १९६९ मध्ये त्यांनी ‘लोकसत्ता’मधून पत्रकारिता सुरू केली. १९८४साली ते येथून उपसंपादक म्हणून निवृत्त झाले. या काळात ते ‘इंडियन एक्स्प्रेस न्यूजपेपर्स’ समूहाच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांकरिताही सक्रिय राहिले. निवृत्तीनंतर १५ वर्षे त्यांचा येथील कर्मचाऱ्यांच्या संघटनेशी संबंध होता. आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात त्यांनी कामगार कायद्याशी संबंधित अनेक पुस्तके लिहिली. मणिभवन गांधी संग्रहालयाचे ते अध्यक्ष होते. गांधी स्मारक निधीचे मानद सचिव आणि गांधी फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.