News Flash

फौजदारी कायद्याची घटनादत्त अधिकारांशी गुंफण घालणारा कायदेतज्ज्ञ!

आरोपीच्या हक्कांचे घटनादत्त अशा जगण्याच्या मूलभूत हक्काशी सांगड घालण्याचे मोठे काम कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी केले

(संग्रहित छायाचित्र)

बेधडक आणि आपल्या तत्त्वांनुसार वागणारा, अशी ओळख असलेले ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी फौजदारी कायद्याची विशेषत: आरोपींच्या हक्कांची घटनादत्त अधिकारांशी गुंफण घालून भारतीय फौजदारी कायदा क्षेत्रात मोलाचे योगदान केले आहे, अशी प्रतिक्रिया कायदेक्षेत्रांतील तज्ज्ञांनी दिली.

आरोपीच्या हक्कांचे घटनादत्त अशा जगण्याच्या मूलभूत हक्काशी सांगड घालण्याचे मोठे काम कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी केले असून भारतीय कायद्यासाठी हे मोठे योगदान असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी दिली. जेठमलानी यांच्यासोबत काम करण्याची संधी आपल्याला मिळाली नाही, परंतु तीन-चार प्रकरणांत आम्ही दोघे आमने-सामने उभे ठाकलो होतो. परंतु वकिलीच्या उमेदीच्या काळात बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या जगन्नाथ पुरी येथे झालेल्या कार्यशाळेच्या निमित्ताने जेठमलानी यांना आठवडाभर जाणून घेण्याचा योग आला. तेथे त्यांना जाणून घेण्याचा विशेषकरून तथ्यावर आधारित असलेल्या फौजदारी कायद्याची गुंफण घटनेच्या मानवी आणि मूलभूत हक्कांसोबत कशी घातली जाते हे त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली, असे अणे यांनी आवर्जून सांगितले. मूलभूत अधिकारांचा संबंध आरोपींच्या हक्कांशी जोडण्याचे, फौजदारी कायद्याचे घटनात्मक कायद्यात रूपांतर करण्याचे असामान्य आणि मोठे काम जेठमलानी यांनी केले. दुसरे म्हणजे ज्याचे वकीलपत्र आपण घेतले आहे, तो अशील निर्दोषच आहे यावर विश्वास ठेवून काम करायला हवे, असे त्यांचे म्हणणे होते. वकिलाच्या शिष्टाचाराचा भाग म्हणून हे करणे आवश्यक आहे, ते वकिलाचे कर्तव्यच आहे, असे त्यांचे ठाम मत होते. त्यांची हीच धारणा महत्त्वाच्या आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेण्यामागे होती. त्यांचे हे मत आपल्याला आजही मान्य नाही. परंतु आरोपींच्या हक्कांसाठी त्यांनी जे काम केले, तेथे पोहोचायला जी उंची लागते ती त्यांच्याकडे होती. त्यांनी ती आत्मसात केली आणि आयुष्यभर ते आपल्या मतावर ठामही राहिले, असे अणे यांनी सांगितले. तर जेठमलानी यांनी फौजदारी कायदा आणि घटनात्मक कायद्याची ज्या पद्धतीने सांगड घातली तशी आतापर्यंत कुणीही घातली नाही. भारतीय फौजदारी कायद्याच्या इतिहासात जेठमलानी यांचे हे योगदान अमूल्य आहे, असे प्रसिद्ध वकील अमित देसाई यांनी सांगितले.

जेठमलानी यांच्यासोबत काम करणारे आणि त्यांना अगदी जवळून पाहणारे प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे यांनीही सगळ्या वर्गातील लोकांसाठी चांगल्या वाईटासाठी लढणारा वकील म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. १९८३ मध्ये आपण जेठमलानी यांच्यासोबत काम करून वकिली कारकीर्दीला सुरुवात केली. मात्र त्यानंतर आपण कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक वकील घडवणाऱ्या जेठमलानी यांचा वयाच्या ८५व्या वर्षीही कामाचा धडाका वाखाणण्याजोगा होता. ते दिवसातील १८ तास काम करायचे. कुठल्याही प्रकरणाच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी कधीच आपल्या कनिष्ठांकडून मदत घेतली नाही. ते स्वत: त्यांना हव्या त्या गोष्टी शोधून काढत, युक्तिवादासाठी आवश्यक नोंदी काढून ठेवत. एवढेच नव्हे, तर ते सतत भारतीय कायदा आणि अन्य देशांतील कायद्यांचा तुलनात्मक अभ्यास करत. त्यांनी सगळ्या प्रकारची प्रकरणे हाताळली. फौजदारी प्रकरणांमध्ये विशेषत: रमले. आपण जेव्हा त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली, त्या वेळी ते देशातील सगळ्यात अधिक पैसा घेणारे, कुठलाही प्रतिस्पर्धी नसलेले नामांकित वकील होते. त्यांनी श्रीमंतांचे वकीलपत्र स्वीकारत बक्कळ पैसा कमावला आणि हा पैसा त्यांनी गरीब अशिलांसाठी वापरला. ते जो वारसा मागे सोडून गेले आहेत तो वकिलांच्या नव्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे मानेशिंदे यांनी सांगितले.

मानेशिंदे यांच्याप्रमाणेच अ‍ॅड्. दिनेश तिवारी यांनाही जेठमलानी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तिवारी यांनी जेठमलानी यांच्यासोबत १२ वर्षे काम केले. त्यांच्यासोबत केलेल्या कामाचा अनुभव सांगताना तिवारी यांनी त्यांच्या एका वेगळ्या कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले. जेठमलानी हे कधीही कुणाची मदत घेत नसत. पुस्तके वाचताना ते सोबत विविध रंगांचे पेन जवळ ठेवत. पुस्तकातील एखादी गंभीर संदर्भ ते नेहमी लाल रंगाच्या, समविचारी लिखाण हिरव्या रंगाच्या वा नकारात्मक विचार काळ्या रंगाच्या पेनने अधोरेखित करत. कामाच्या आणि प्रत्येक बाबींमध्ये ते अत्यंत शिस्तबद्ध होते. बॅडमिंटन हा त्यांचा आवडता खेळ. चार वर्षांपूर्वीपर्यंत ते तो खेळत होते, असेही तिवारी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 1:37 am

Web Title: senior lawyer former minister ram jethmalani criminal law abn 97
Next Stories
1 आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी सर्व प्रवर्गासाठी समान पात्रता गुण?
2 राज्यात २.४२ कोटी शिधापत्रिकांचे संगणकीकरण
3 ‘राज्यात पाच वर्षांत ६० लाख व्यक्तींना रोजगार’
Just Now!
X