03 March 2021

News Flash

मराठी संगीत विश्वातील ‘देव’ हरपला, यशवंत देव यांचे निधन

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

मराठी संगीत विश्वावर आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. आज (मंगळवार) सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अशक्तपणा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर त्यांना न्यूमोनियाही जडल्याचे निदान झाले होते. त्यादृष्टीने त्यांच्यावर उपचारही सुरू होते.

यशवंत देव यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ साली झाला होता. वडिलांकडूनच त्यांना संगीताचे सुरुवातीचे धडे मिळाले. तेच त्यांचे पहिले गुरू होते. त्यांच्याकडून त्यांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’ अशा शेकडो गीतांना संगीतसाज चढवून यशवंत देव यांनी भावसंगीताचे विश्व समृद्ध केले होते. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले होते.

आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली होती . मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘भावसरगम’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्याद्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. ग. दि. माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या ‘कथा ही रामजानकीची’ या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 7:23 am

Web Title: senior marathi music director yashwant dev passes away
Next Stories
1 युतीसाठी आग्रह धरणे लाचारी नव्हे
2 बोटबुडीनंतर प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
3 मेळघाटात सात महिन्यांत २७६ बालमृत्यू
Just Now!
X