News Flash

पोलीस दलात बंडाचे वारे

बढतीने आयपीएस झालेल्या मराठी अधीक्षकांना जाणूनबुजून पदावनत केल्यामुळे आधीच टीकेचे धनी बनलेले राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्याविरोधात आता पोलीस दलात बंडाचे वारे वाहू लागलेआहेत.

| December 10, 2014 12:12 pm

बढतीने आयपीएस झालेल्या मराठी अधीक्षकांना जाणूनबुजून पदावनत केल्यामुळे आधीच टीकेचे धनी बनलेले राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्याविरोधात आता पोलीस दलात बंडाचे वारे वाहू लागलेआहेत. दयाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांनी उघडपणे असंतोष व्यक्त केला असून अशा अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणे शक्य नसल्याचे सूचित केले आहे. अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने उघडपणे मत व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबर रोजी एक बैठक बोलावली होती. तीत रेल्वेचे अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे व राज्याच्या दहशतवादी पथकाचे प्रमुख हिमांशू रॉय यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, दयाळ यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून बैठकीला हजर राहण्याची आवश्यकता
नसल्याचे सांगितले. बैठकीतील अनुपस्थितीविषयी गृह खात्याने या दोन्ही अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले. बर्वे आणि रॉय यांनी झाला प्रकार गृह खात्याला लेखी कळवला. आता त्याविषयी गृह खात्याने दयाळ यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. ‘महासंचालक सरकारपेक्षाही मोठे झाले आहेत का’, असाच सूर गृह खात्याने पाठवलेल्या पत्राचा असल्याचे समजते. पोलीस मुख्यालयात राज्याच्या नियोजन व समन्वय विभागाचे अतिरिक्त महासंचालक असलेल्या हेमंत नगराळे यांनीही त्यांना संजीव दयाळ यांच्याकडून वारंवार दिल्या जात असलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल गृह खात्याकडे लेखी नाराजी प्रकट केली आहे. बर्वे, रॉय व नगराळे या तीनही महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रारी नोंदवल्यामुळे एकूणच दयाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यासंदर्भात मला काहीही बोलायचे नाही. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे (गृह विभाग) याविषयी विचारणा करा.
– संजीव दयाळ, पोलीस महासंचालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2014 12:12 pm

Web Title: senior officers complaint against dg
Next Stories
1 मुंबई महापालिकेच्या इंग्रजी शाळांकडेही विद्यार्थ्यांची पाठ
2 मॅक्सीनाम्याचा फतवा महिला मंडळाकडून मागे
3 ससून डॉकमध्ये नाखवा, खलाशांचे काम बंद आंदोलन मागे
Just Now!
X