पनवेल तालुक्यातील भिंगारी गावानजीकच्या कपल ऑर्केस्टा बार व शेजारच्या डिंपल लॉजवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी टाकलेल्या छाप्यात ९० बारबाला व सव्वा कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे प्रकरण पनवेल पोलिसांवर चांगलेच शेकले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश घडविले यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र पनवेल पोलिसांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या या कुंटणखान्याला केवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक जबाबदार आहे का, असा सवाल स्थानिक रहिवासी करीत आहेत.
इंडियन रेस्क्यू मिशन या सेवाभावी संस्थेने केलेल्या तक्रारीनुसार पोलीस महानिरीक्षक संजीव दयाल यांनी ठाणे ग्रामीण पोलिसांना पनवेलमधील कपल बार व डिंपल लॉजवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोस चालणाऱ्या या बार व लॉजमध्ये होणाऱ्या वेश्याव्यवसायाला रमेश घडविले यांना जबाबदार धरून पोलीस आयुक्त अशोक शर्मा यांनी शनिवारी निलंबित केले. मात्र या विभागाचे उपायुक्त प्रमोद शेवाळे व साहाय्यक आयुक्त दिलीप माने यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आश्र्चय व्यक्त केले जात आहे. ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली नवी मुंबईत आजही बार उशिरापर्यंत सुरू असल्याचे समजते.