राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शाळा शिक्षकांचा तीन वर्षांचा शिक्षणसेवकपदाचा कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणीकरिता ग्राह्य़ धरला जाणार आहे. राज्यातील ५० हजार शिक्षकांना या निर्णयाचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. सेवेत कायम झाल्यानंतर १२ वर्षांच्या सेवेनंतर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळते. ही मोठी पदोन्नती मानली जाते. या १२ वर्षांच्या सेवेत तीन वर्षांचा शिक्षणसेवकपदाचा कालावधी ग्राह्य़ धरला जात नव्हता. तसा तो धरण्यात यावा यासाठी राज्यभरातील शिक्षकांकडून मागणी होत होती. तीन महिन्यांपूर्वी माध्यमिक शिक्षकांसाठी शिक्षकसेवकपदाचा कालावधी पदोन्नती देताना ग्राह्य़ धरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र त्यातून प्राथमिक शिक्षकांचा उल्लेख वगळण्यात आल्याने त्यांच्यात मोठी अस्वस्थता होती. आता प्राथमिक शिक्षकांचाही शिक्षणसेवकपदाचा कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणी देताना ग्राह्य़ धरला जाणार असल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आणि शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनीही या निर्णयाचे स्वागत करीत यामुळे प्राथमिक शिक्षकांवरील अन्याय दूर होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.